पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी सक्तीची
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छणाऱया विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नेंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 18 जुलैपासून सुरू झाल्याचे विद्यापिठातर्फे कळविण्यात आले आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ असून ती विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीची असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.
पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छणाऱया विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी मुंबई विद्यापीठाने प्रथमवर्ष बी. ए., बी. एस्सी, बी. कॉम, बीएमएमएम, बीएसडब्ल्यू, बीए (प्रेंच स्टडी), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स एन जर्मन स्टडी), बीएमएस, बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्सिअल मार्केट), बीकॉम (अकौन्टींग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्सिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायोकेमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीव्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टुरिझम अँड ट्रव्हल मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट) आणि लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
ही ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील (click on- Mumbai University Pre Admission Online Registration 2020-21) या लिंकवर क्लिक करणे गरजेचे आहे.
असा करावा ऑनलाईन अर्ज
विद्यार्थ्यांने स्वत:बद्दलची माहिती भरून नोंदणी करणे, एकदा अचूक माहिती भरल्यावर दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होताच विद्यार्थ्यांने सर्वप्रथम स्वत:बद्दलच्या माहितीची खातरजमा करून पासवर्ड बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड किंवा बदलेल्या पासवर्डच्या मदतीने सर्वप्रथम स्वत:बद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता, माहिती भरायची आहे. त्यानंतर स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. Confirm Profile वर क्लीक करून माहितीची खातरजमा करता येईल. ऑनलाईन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमूद केलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्यांनी निवडायचे आहेत. सोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायचे आहेत. एकदा पूर्ण आणि अचूक माहिती भरली गेल्याची खातरजमा करून भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट घेऊन संबंधित महाविद्यालयात सादर करायची आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना लक्ष द्या
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी माहिती पुस्तिकेनुसार विषय व विषय समूहाप्रमाणेच विषय निवडणे बंधनकारक असणार आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजीस, मल्टी कोर्ससाठी करता येईल. विद्यार्थ्यांने शिक्षणक्रमनिहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य त्या दस्ताऐवजासह सादर करायची आहेत. विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे अधिकार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना असतील, याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही, याची नोंद घ्यावी, असेही विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.