क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
पूर्ण सामन्यावर निर्विवादपणे वर्चस्व ठेवत मुंबई सिटी एफसीने हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत एका आकर्षक विजयाची नोंद केली. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मुंबई सिटी एफसीने ईस्ट बंगालचा 3-0 गुणांनी पराभव केला. या सामन्यात उत्कृष्ट खेळ करणाऱया हय़ुगो बूमोसला सामनावीरचा रोख 50,000 पुरस्कार प्राप्त झाला.
स्पर्धेतील हा ईस्ट बंगालचा सलग दुसरा पराभव तर मुंबई सिटीचा सलग दुसरा विजय ठरला. मुंबई सिटीसाठी ऍडम फोंड्रेने दोन तर हर्नन सांतानाने एक गोल केला. विजयाच्या 3 गुणांनी मुंबई सिटीचे आता 3 सामन्यांतून 6 गुण झाले असून ईस्ट बंगालचा गुणफलक कोराच आहे.
सामन्याच्या सातव्याच मिनिटाला ईस्ट बंगालला जबर धक्का बसला. त्यांचा कप्तान आणि स्टार बचावपटू डॅनियल फॉक्स जखमी झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. याचा परिणाम त्यांच्या बचावफळीवर झाला. 9 व्या मिनिटाला मंदार राव देसाई आणि ऍडम फोंड्रे यांनी संयुक्तपणे रचलेल्या चालीवर हय़ुगो बूमोसने हाणलेला फटका ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदारने अडविला.
सामन्यातील आपली पहिली धोकादायक चाल ईस्ट बंगालने 19 व्या मिनिटाला रचली. यावेळी फॉक्सच्या स्थानावर खेळण्यास आलेल्या मोहम्मद रफीकने मारलेला फटका मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने लिलया अडविला. दुसऱया सत्रात मुंबई सिटी एफसीने आपल्या आक्रमणाचा धडाका कायम ठेवला आणि आणखी दोन गोल नोंदविले. काल मध्यफळीत मुंबई सिटीचा मध्यरक्षक अहमद जाहूने आकर्षक खेळ केला. त्याने मैदानाच्या दोन्ही बगलेतून आपल्या स्ट्रायकर्सना चांगले पासेस दिले.
प्रथम 48 व्या ऍडम फोंड्रेने मिळालेल्या पेनल्टीवर गोल करून मुंबई सिटीला दोन गोलांची आघाडी मिळवून दिली. अहमद जाहूने दिलेला पास हय़ुगो बूमोस फटका हाणण्याच्या प्रयत्नात असताना गोलरक्षक मजुमदारने त्याला अयोग्य पद्धतीने पाडले. यावर मिळालेल्या पेनल्टीवर फोंड्रेने गोल केला. 58 व्या मिनिटाला बूमोसच्या फ्रि कीकवर हर्नन सांतानाने एक आकर्षक फटका हाणून मुंबई सिटी एफसीचा तिसरा गोल करून संघाला शानदार विजय प्राप्त करून दिला.