क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
एटीके मोहन बागानचा 2-0 गोलांनी पराभव करून मुंबई सिटी एफसीने आयएसएल लीग शील्ड मिळविले. या जेतेपदाने मुंबई सिटीने एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत खेळण्याचीही पात्रता मिळविली. रविवारी हा निर्णायक सामना बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आला. मुंबई सिटीने दोन्ही गोल पहिल्या सत्रात नोंदविले. मुर्तादा फॉलने आघाडीचा गोल केल्यानंतर बार्थोलॉमियाँव ओगबेचेने दुसरा गोल केला.
या विजयाने मुंबई सिटीला तीन गुण प्राप्त झाले. मुंबई सिटी आणि एटीके मोहन बागानचे 20 सामन्यांतून प्रत्येकी 40 गुण झाले, मात्र चांगल्या गोलसरासरीने मुंबई सिटीचा संघ पहिल्या स्थानावर आला. आयएसल लीगची शील्ड मिळविण्यासाठी एटीके मोहन बागानला केवळ बरोबरीची आवश्यकता होती, मात्र मुंबईने सफाईदार विजय मिळवून एटीकेचे मनसुबे उधळले.
मुंबईच्या बचावफळीने काल अभेद्य बचाव केला. एटीकेचे स्टार स्ट्रायकर्स रॉय कृष्णा, डेव्हीड विलियम्स आणि मानवीर सिंग यांना मुक्तपणे खेळ करण्याची संधीच मुंबईने दिली नाही. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला मुंबईने आक्रमक चाल करून आपले इरादे स्पष्ट केले. यावेळी मंदार राव देसाईने दिलेल्या पासवर प्रांजल भुमीजचा गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला.
त्यानंतर चौथ्याच मिनिटाला एटीकेच्या मार्सेलिनो परेराने दिलेल्या पासवर रॉय कृष्णाचा फटका मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने अडविला. सातव्याच मिनिटाला मुंबईने गोल केला व आघाडी घेतली. अहमद जोहूने घेतलेल्या फ्रिकीकवर मुर्तादा फॉलने एका जबरदस्त हेडरवर प्रतिस्पर्धी गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यला भेदले व आघाडीचा गोल केला. त्यानंतर जोहूच्या क्रॉसवर प्रांजलची गोल करण्याची संधी वाया गेल्यानंतर 39 व्या मिनिटाला मुंबईने दुसरा गोल केला. यावेळी हर्नान सँटानाने घेतलेली फ्रिकीक गोलच्या आडव्या बारला आदळून परत आल्यानंतर मिळालेल्या रिबाऊंडरवर ओगबेचेने हेडने अरिंदमला चकविले आणि दुसरा गोल केला.
गोवा-मुंबई; एटीके-नॉर्थईस्ट आता उपान्त्य लढती
सर्व लीग सामने संपल्यानंतर आता फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडने डबल लेग उपान्त्य फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई सिटी, एटीके मोहन बागान, नॉर्थईस्ट युनायटेड आणि एफसी गोवा हे चार संघ आयएसएलच्या जेतेपदासाठी झुंज देतील. स्पर्धेतील अंतिम सामना 13 मार्च रोजी होणार आहे. त्यापूर्वी 5 मार्च रोजी एफसी गोवा आणि मुंबई सिटी (फातोर्डा), 6 मार्च रोजी नॉर्थईस्ट आणि एटीके मोहन बागान (बांबोळी), 8 मार्च रोजी एफसी गोवा आणि मुंबई एफसी (बांबोळी) तर 9 मार्च रोजी एटीके मोहन बागान आणि नॉर्थईस्ट (फातोर्डा) यांच्यात उपान्त्य लढती होतील.