ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. या नंतर तातडीने रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 9 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. ज्याच्यानंतर मुंबई पोलिस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. हे सर्च ऑपरेशन दोन तास सुरु होते. सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू या ठिकाणी आढळून आली नाही. या निनावी फोननंतर भायखळा, दादर रेल्वे स्थानकावर देखील जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. या स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती.
दरम्यान, या फोनवरुन एका व्यक्तीने पोलिसांना मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा रेल्वे स्थानकं आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणी दाखल झाले. बराच वेळ शोधाशोध करण्यात आली. मात्र, कोणतीही स्फोटकं किंवा संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळून आली नाही. पोलिसांनी ज्या नंबरवरुन फोन आला त्या नंबरवर फोन केला. त्यावेळी, समोरच्या व्यक्तीनं माझ्याकडे जी माहिती होती, ती मी तुम्हाला दिली, असे सांगितले आणि त्या व्यक्तीने फोन बंद केला. त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू आहे.