ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) बीकेसी कार्यालयातील 68 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्यांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सीबीआय कार्यालयातील 235 कर्मचाऱ्यांची महापालिकेच्या वतीने कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 68 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. बाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या मुंबईत डॉक्टर्स, बेस्ट कर्मचारी आणि पोलिसांना मोठय़ाप्रमाणावर करोनाची लागण होताना दिसत आहे. शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांच्या 93 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई पोलीस विभागातील संक्रमितांची संख्या 9,657 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये 125 जवानांचा समावेश आहे. सध्या 409 बाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तसेच मागील 48 तासात दोन पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला आहे.