मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल खेळविण्यात आलेल्या सामन्यात हैदराबाद एफसीने अग्रस्थानावर असलेल्या बलाढय़ मुंबई सिटी एफसीला कडव्या झुंजीनंतर गोलशून्य बरोबरीत रोखले. काल हा सामना बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर खेळविण्यात आला.
या बरोबरीने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. मुंबई सिटी एफसीची 11 सामन्यांतील केवळ दुसरी बरोबरी ठरली. आठ विजय व एक पराभवाने त्यांचे आता 26 गुण झाले आणि त्यांचे अग्रस्थान कायम राहिले. हैदराबाद एफसीचे आता 11 सामन्यांतून 4 विजय, 4 बरोबरी आणि 3 पराभवाने 16 गुण झाले व त्यांचे चौथे स्थान कायम राहिले. सध्या एटीके मोहन बागानचे 10 सामन्यांतून 20 गुण झाले असून ते दुसऱया तर एफसी गोवा संघ 11 सामन्यांतील 18 गुणांनी तिसऱया स्थानावर आहेत.
काल हैदराबाद एफसीने चांगला खेळ करून मुंबई सिटीला चांगली झुंज दिली व सामना सन्मानाने अनिर्णीत ठेवला. पहिल्या सत्रात मुंबई सिटीचे सामन्यावर वर्चस्व आढळून आले. हैदराबादने सुद्धा अधुनमधून चांगली धोकादायक आक्रमण केली. त्यांच्या लिस्टन कुलासो, जॉएल चियानीसे आणि आरीदाने सँटानाचे सामन्यात गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले.
सामन्याच्या 9व्या मिनिटाला गॉडार्डने दिलेल्या पासवर ऍडम ली फोंड्रेने हाणलेला फटका हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणीने आपल्या उजव्या बाजूने झेपावत अडविला. लगेच मुर्तादा फॉलच्या पासवर अहमद जाहूने हाणलेला शॉट दिशाहीन ठरला. हैदराबादने आपली धोकादायक चाल 16व्या मिनिटाला रचली. यावेळी आरीदाने सँटानाच्या पासवर लिस्टन कुलासाने मारलेला फटका मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने अडवून संघावर होणारा संभाव्य गोल टाळला.
त्यानंतर हैदराबादच्या लिस्टन कुलासोच्या पासवर हितेश शर्माने दिशाहीन फटका हाणला व गोल करण्याची नामी संधी गमविली. लगेच जॉएल चियानीसेचा गोल करण्याचा यत्न अमरिंदर सिंगने अडविला. गोव्याच्या लिस्टन कुलासोचा या स्पर्धेत खेळ आता प्रत्येक सामन्यागणिक बहरत आहे. काल दुसऱया सत्रात 63व्या मिनिटाला आपल्या त्याने मुंबईच्या विग्नेश दक्षिणमुर्तीला भेदत दिलेल्या पासवर आरीदानेचा गोलमध्ये जाणारा हेडर अमरिंदर सिंगने अडविला.
शेवटच्या पंधरा मिनिटात दोन्ही संघांनी विजयी गोल करण्याचे कित्येक प्रयत्न केले. यावेळी मुंबई सिटी एफसीच्या बार्थोलॉमियाँव ओगबेचे दोन वेळा तर अहमद जोहू याचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. या बरोबरीने मुंबई सिटी एफसीच्या विजयी मोहिमेला हैदराबाद एफसीने ब्रेक दिला.