पुणे / वार्ताहर :
नारळाच्या व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी एक हजारांची लाच मागून पाचशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) पुणे महापालिकेच्या मुकादमासह बिगाऱयाला अटक केली आहे. मुकादमाच्या घरात झडतीमध्ये तब्बल 36 लाख रुपयांची रोकड आणि 10 तोळे सोन्याचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. यामुळे महापालिकेतील खाबुगिरी यानिमित्ताने चव्हाटय़ावर आली आहे.
मुकादम सुनील रामप्रकाश शर्मा (55, रा. वडगावशेरी, नगररोड, क्षेत्रीय कार्यालय) याला बिगारी गोपी मच्छिंद्र उबाळे (32, रा. वडगावशेरी, नगररोड क्षेत्रिय कार्यालय) याच्यामार्फत लाच स्वीकारताना शनिवारी दुपारी अटक करण्यात आली होती.
याबाबत नारळ विक्रेत्या तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मुकादम शर्मा आणि त्याचा सहकारी उबाळे यांच्याविरोधात नारळाच्या व्यावसायावर कारवाई न करण्यासाठी हजार रूपयांची मागणी करत होते. त्यानुसार शनिवारी तडजोडी अंती पाचशे रूपये देण्याचे ठरले. परंतु, तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार शनिवारी दुपारी सापळा रचून बिगारी उबाळे याच्यांमार्फत लाच स्विकारताना दोघांना अटक करण्यात आली. मुकादमाच्या रात्रभर सुरू असलेल्या घराच्या झडतीमध्ये एसीबीला 36 लाख रूपये आणि दहा तोळे सोने सापडले आहे. त्याला रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता अधिक तपासासाठी दोघांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. दोघांनाही विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे एसीबीचे पोलिस उपाधीक्षक श्रीहरी पाटील यांनी सांगितले.