ऑनलाईन टीम / मुंबई :
काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. परंतु, ही गाडी तिथे कोणी ठेवली यासंदर्भात अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, स्फोटके ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यातच आता, अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन असे त्याचे नाव आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन काल रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारीला सापडली होती. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.
दरम्यान, मुकेश अंबानी यांच्यासारखे उद्योजक सुरक्षित नाहीत. त्यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोबतच या प्रकरणात त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. विधानसभेत बोलताना त्यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांचा घटनाक्रमासह अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर आरोप केले.