ऑनलाईन टीम / मुंबई
बॉलिवूडमध्ये दर आठवड्याला नवनवीन चित्रपट येतच असतात . अशातच एक मल्टिस्टारर लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये हिंदीसोबतच मराठी कलाकारसुद्धा झळकणार आहेत. या लघुपटाच्या निमित्ताने मराठीतली सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे पहिल्यांदाच काजोलसोबत काम करणार आहे. काजोल आणि मुक्तासोबतच यामध्ये श्रुती हसन, नेहा धुपिया, रमा जोशी, शिवाजी रघुवंशी , नीना कुळकर्णी, संध्या मात्रे, आणि यशस्विनी दायमा या लघुपटात दिसणार आहेत . ‘देवी’ असं त्याचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
या लघुपटाच्या पोस्टरमध्ये विभिन्नता दिसून येते. मुक्ता बर्वे बुरख्यात पाहायला मिळतेय तर काजोल एका आईच्या भूमिकेत असल्याचं समजतंय. विशेष म्हणजे केवळ दोन दिवसांत या लघुपटाचं चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या लघुपटाचं लेखन दिग्दर्शन प्रियांका बॅनर्जी यांनी केलं आहे . काजोलचा हा पहिलाच लघुपट असून श्रुतीसुद्धा ‘देवी’च्या माध्यमातून डिजिटल विश्वात पदार्पण करतेय. हा लघुपट महिलांशी संबंधित असून प्रेक्षकांमध्ये याची प्रचंड उत्सुकता आहे