शेकडो खाटांची व्यवस्था
प्रतिनिधी / पणजी
बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करणाची पाळी सरकारवर आली असून तेथे आता लवकरच कोरोना रुग्णांची भरती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्टेडियममध्ये हजारो खाटा तैनात करण्यात आल्या असून अन्य साहित्याचीही जमवाजमव सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण प्रतिदिन शेकडय़ांनी वाढत असून त्यांना कुठे ठेवायचे? हा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला आहे आणि ती एक डोकेदुखी झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी तयार केलेली कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाली असून मडगावचे कोविड हॉस्पिटल रुग्णांनी भरून वाहत आहे. त्यावर उपाय म्हणून विविध ठिकाणी सेंटर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुखर्जी स्टेडियम हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी तयार करण्यात आले होते. आता कोरोनामुळे सर्व काही बंद असल्याने ते रुग्णांसाठी वापरात आणले जाणार आहे. त्याची सर्व तयारी करण्यात आली असून डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचाऱयांनाही तेथे पाचारण करावे लागणार आहे. दक्षिण गोव्यात यापूर्वीच कोविड इस्पितळ सुरू करण्यात आले असून सर्व रुग्णांना तेथे पाठविले जाते. परंतु तेथील सर्व 220 बेड भरलेल्या असल्याने उत्तर गोव्यातही तसेच कोविड इस्पितळ सुरू करण्याचा इरादा होता. कदाचित मुखर्जी स्टेडियमचे रुपांतर कोविड इस्पितळात होण्याचे संकेत मिळत आहेत.