सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हस्तांतरण पूर्ण
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील कुविख्यात गुंड आणि गुन्हेगार मुख्तार अन्सारी याला पंजाब सरकारने उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात दिले आहे. त्याचे हस्तांतरण करण्यात यावे, असा आदेश काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. अन्सारी हा सध्या बहुजन समाज पक्षाचा आमदार आहे. हत्या प्रकरणात त्याला शिक्षा झाली आहे. पंजाबच्या मोहाली येथून त्याला उत्तर प्रदेशात आणण्यात आले आहे.
मंगळवारी पहाटे उत्तर प्रदेश पोलीस मोहाली येथे पोहचले. सकाळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अन्सारी याला पुन्हा मोहाली येथील कारागृहात नेण्यात आले. तेथे त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याचा मुक्काम बरीच वर्षे पंजाबच्या रोपड येथील कारागृहात होता. आता त्याला बांदा येथील कारागृहात ठेवण्यात येणार आहे. त्याच्या हस्तांतरणाची मागणी उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करून केली होती.
52 गुन्हे, खून आणि खंडणी
अन्सारी याच्यावर उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये 52 गुन्हय़ांची नोंद आहे. यापैकी 15 प्रकरणांमध्ये त्याच्यावर न्यायालयीन कारवाई होत आहे. त्याने केलेल्या गुन्हय़ांमध्ये खून, दरोडे, खंडणीवसुली अशा अनेक निर्घृण गुन्हय़ांचा समावेश आहे. एका खंडणी प्रकरणात त्याला कारावासात डांबण्यात आले होते. त्याच्याशी संबंधित 96 आरोपींना आतापर्यंत पकडण्यात आले असून त्याची 196 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एका व्यक्तीला अंगावर ऍसीड ओतून ठार केल्याचाही आरोप अन्सारीवर करण्यात आला आहे. प्रयागराज न्यायालयाने काढलेली 26 वॉरंट्स् त्याने धुडकावली होती. तो आतापर्यंत पाच वेळा उत्तर प्रदेशातील मऊ मतदारसंघातून विधानसभेवर निवडला गेला आहे.
आजोबा काँगेसचे माजी अध्यक्ष
मुख्तार अन्सारी याच्या आईचे वडील डॉ. मुख्तार अहमद अन्सारी हे 1927-1928 या एक वर्षासाठी भारतीय राष्ट्रीय काँगेसचे अध्यक्ष होते. त्याचे वडीलही माजी सैनिकी अधिकारी होते अशी माहिती उपलब्ध आहे.