प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्याचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. राजभवन येथे सकाळी 11 वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देवविली.
भाजप नेते बी. एस. येडियुराप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री बेंगळूरमध्ये पार पडलेल्या भाजप विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत बसवराज बोम्माई यांची राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करत पक्षातील सर्व आमदारांच्या पाठिंब्याचे स्वाक्षरीपत्र राज्यपालांना सादर केले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी राजभवनमधील ग्लासहाऊसमध्ये बोम्माई मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध झाले. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्य भाजप प्रभारी अरुणसिंग, सहप्रभारी अरुणा, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्यासह भाजपमधील अनेक आमदार, विधानपरिषद सदस्य, माजी मंत्रीही यावेळी उपस्थित होते.
शपथग्रहणापूर्वी बोम्माई यांनी बालब्रुही अतिथीगृहाजवळील अंजनेय स्वामी मंदिरात विशेष पूजा केली. नंतर येडियुराप्पा यांची भेट घेत आशीर्वाद घेतले व कुमारकृपा अतिथीगृहात जाऊन धर्मेंद प्रधान, अरुणसिंग यांची भेट घेत एकत्रितपणे राजभवनावर आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी त्यांच्या नावाचा जयजयकार केला. शपथबद्ध झाल्यानंतर त्यांनी विधानसौधमधील मुख्यमंत्री कार्यालयात पूजा करून ते आसनस्थ झाले. दुपारी वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.