आज पणजीत भाजप नवनिर्वाचित सदस्यांची बैठक : केंद्रीय निरीक्षकांसह फडणवीसही राहणार उपस्थित,मुख्यमंत्रीपदासाठी विश्वजित राणे यांचेही लॉबिंग
प्रतिनिधी /पणजी
भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांची आज पणजीत बैठक होईल. त्यात डॉ. प्रमोद सावंत यांची विधिमंडळ नेतेपदी निवड निश्चित आहे. सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी शक्य असून मंगळवार वा बुधवारी राज्य विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे देखील जोरदार लॉबिंग चालू आहे. तथापि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली पसंती डॉ. प्रमोद सावंत यानाच आहे.
प्राप्त माहितीनुसार भाजपचे दोन निरीक्षक आज शनिवार 12 मार्च रोजी दुपारपर्यंत गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. भाजपला गोवा विधानसभेत काठावरचे बहुमत प्राप्त झालेले आहे. भाजपला आगामी लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती निवडणुकीचा विचार करूनच आघाडी सरकार स्थापन करायचे आहे. त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी विचारविनीमय करूनच मगो पक्षाला सरकारबरोबर घेण्याचे ठरविले आहे. स्थानिक पातळीवर हा निर्णय झालेला नाही.
मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंतच?
भाजपला विधिमंडळ नेता निवडायचा आहे. त्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. या उलट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोणतेही लॉबिंग सुरू केलेले नाही. तथापि, गोवा विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली झाल्या आहेत. राज्यात भाजपसाठी डॉ. प्रमोद सावंत यांनी जवळपास सर्वच मतदारसंघात झोकून काम केले आहे. सर्व ठिकाणी जाहीरसभा देखील घेतल्या. गोव्यात भाजपला जे काही यश मिळाले त्या यशाचे ते देखील एक महत्त्वाचे मानकरी ठरतात. त्यामुळेच डॉ. प्रमोद सावंत यांच्याच गळय़ात पुन्हा मुख्यमंत्रीपदाची माळ घातली जाईल.
सोमवारी शपथग्रहणाची शक्यता
डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर कदाचित सोमवारी सायंकाळी शपथग्रहण सोहळा राजभवनच्या नव्या दरबार हॉलमध्ये होईल. तत्पुर्वी आज रात्री एक महत्त्वाची बैठक होऊन तीत राज्यमंत्रिमंडळ कशा पद्धतीने असावे हे ठरविले जाईल. मुख्यमंत्र्यांबरोबर देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होईल. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हे देखील उपस्थित रहातील.
एका घरात एकच मंत्रीपद
राज्य मंत्रिमंडळाची रचना कशी असावी, याबाबत अद्याप जरी निर्णय झालेला नसला तरी नव्याने निवडून आलेल्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत. एका घरात एकच मंत्रीपद दिले जाणार आहे.
सर्व तालुक्यांना प्राधान्य
प्रत्येक तालुक्याला एक मंत्रीपद मिळावे या अनुषंगाने प्रयत्न राहील. अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या व आजवर गोव्याच्या इतिहासात सांगे तालुक्यात कधीही मंत्रीपद मिळालेले नव्हते. तरीही सांगे तालुका हा नेहमीच भाजपच्या पाठिशी राहिला. त्या सांगे तालुक्याला देखील मंत्रिमंडळात यावेळी प्रथमच संधी मिळणार आहे. धारबांदोडय़ातून विजयी झालेल्या डॉ. गणेश गावकर यांनाही प्रथमच संधी प्राप्त होण्याची शक्यता वाढली आहे.
दोघा अपक्षांना मिळू शकतात मंत्रीपदे
अपक्षांपैकी डॉ. चंद्रकांत शेटय़े आणि आलेक्स रेजिनाल्ड या दोघांनाही संधी मिळू शकते.
सुभाष शिरोडकर होणार सभापती ?
भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष शिरोडकर यांच्या गळय़ात सभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता वाढली आहे. शिरोडकर यांना अनेक वर्षांचा विधानसभा सदस्यत्वाचा दांडगा अनुभव आहे व ते सर्वात ज्येष्ठ आहेत. शिवाय ते नेहमीच शांत असतात आणि कोणत्याही वादात असत नाहीत. त्यामुळे सभापतीपदाची माळ त्यांच्याच गळय़ात पडणार असल्याचे वृत्त आहे.
देवेंद्र मुंबईत, आज गोव्यात परतणार
भाजपचे गोवा निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी मुंबईला गेले. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन चालू आहे. तिथे शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार होता. त्या निमित्ताने ते मुंबईला गेले. आज शनिवारी ते पुन्हा गोव्यात परतणार आहेत. गोव्यात भाजपचे सरकार स्थापन करून नंतरच ते मंगळवारी पुन्हा मुंबईला रवाना होतील.
सोमवारी ठरणार भाजप गटनेता : डॉ. प्रमोद सावंत
केंद्रीय निरीक्षकांच्या हजेरीत विधीमंडळ बैठक : मंत्रीमंडळ-विधानसभा विसर्जनाचा प्रस्ताव
विद्यमान मंत्रिमंडळ आणि विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून तसा ठराव मंजूर केला आहे. सोमवारपासून त्याची कार्यवाही होणार असून तो ठराव राज्यपालांकडे सोमवारी पाठविण्यात येणार आहे. सोमवारीच सरकार स्थापनेची प्रक्रिया चालू होणार असून भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या हजेरीत विधीमंडळ गटनेता निवड करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
विद्यमान विधानसभेची मुदत 16 मार्च रोजी संपुष्टात येत असून तोपर्यंत सरकार स्थापन होणे व विधानसभा बैठक होणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवार दि. 14 मार्च ते बुधवार दि. 16 मार्च या कालावधीत सरकारची स्थापना, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी व विधानसभेची पहिली बैठक होणे अपेक्षित आहे.
भाजप व सरकारला जनतेने पुन्हा मतदान करुन पाठिंबा दिल्याचे सांगून जनतेचे आभार मानणारा ठराव देखील मंत्रिमंडळाने संमत केला आहे.
दरम्यान, मगो पक्षाला सरकारमध्ये सामील करुन घ्यायचे की नाही याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेते घेणार असल्याचे सांगून डॉ. सावंत यांनी हा विषय केंद्रावर सोपवला आहे. मगोप, अपक्ष आमदार व इतर जे कोण भाजपला साथ देतील त्यांना घेऊन भाजप पुढील वाटचाल करणार असल्याचे निवेदन डॉ. सावंत यांनी केले.