प्रतिनिधी / पणजी
नवीन वर्ष 2021 च्या पूर्वसंध्येला म्हणजे आज गुरुवार दि. 31 डिसेंबर रोजी वर्षाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 10 प्रमुख आणि महत्त्वाच्या खात्यांची बैठक बोलावली असून त्यात मागील 10 वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीत त्या 10 खात्यांना मागील 10 वर्षातील कामकाज अहवाल सादर करण्याचे निर्देश डॉ. सावंत यांनी दिले आहे.
संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत 5 खाती व नंतर 5 ते 6 वाजेपर्यंत 5 खात्यांची बैठक सचिवालयात बोलाविण्यात आली असून त्या 10 खात्यांचे प्रमुख तसेच सचिवांना बैठकीस हजर राहावे असा आदेश सरकारतर्फे जारी करण्यात आला आहे. वाणिज्य कर, नगर – नियोजन, वाहतूक, राज्य निबंधक – नोटरी, अबकारी, वीज, सार्वजनिक बांधकाम, जलस्रोत, खाणी, महसूल या 10 खात्यांचा त्यात समावेश आहे.
खाण बंदी आणि कोरोनाचे संकट यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली असून महसूलही कमी झाला आहे. त्यावर चर्चा करुन योग्य ते निर्णय घेण्यासाठी विविध अशा एकूण 13 मुद्यांवर विचार – विनिमय होणार आहे. उपरोक्त 10 खात्यांची गेल्या 10 वर्षातील विविध क्षेत्रातील तपशीलवार माहिती बैठकीत सादर करण्याची सूचना त्या सर्व खात्यांना करण्यात आली आहे.