ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. तिथे रामलल्लांचे दर्शन घेऊन ते शरयू तिरावर आरती करणार आहेत, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी दिली.
एका आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. ते म्हणाले, येत्या 7 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. हा आमचा श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्याचे राजकारण करू नये. श्रीरामांचे दर्शन घेऊन शरयू तिरावर मुख्यमंत्री आरती करणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत हजारो शिवसैनिक उपस्थित असणार आहेत, असेही राऊत म्हणाले.
राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला होता. महाविकास आघाडीला 100 दिवस झाल्यानंतर हा दौरा होऊ शकतो, असे वृत्त त्यावेळी माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते.