कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा : बिम्सच्या कारभारावर इलाज होणार का?
बेळगाव : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे शुक्रवार दि. 4 जून रोजी बेळगाव दौऱयावर येणार आहेत. सुवर्ण विधानसौधमध्ये जिल्हय़ातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. याचवेळी गैरकारभारांमुळे व अधिकाऱयांच्या मनमानीमुळे रोगग्रस्त झालेल्या बिम्सवरही इलाज होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाला असून शुक्रवार दि. 4 जून रोजी सकाळी 10.45 वाजता बेळगावला येणार आहेत. 11 वाजता सुवर्णविधानसौधमध्ये अधिकाऱयांची बैठक घेऊन जिल्हय़ातील कोरोनासंबंधीची परिस्थिती व कोरोना थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. इतर विकासकामांवरही चर्चा होणार आहे. दुपारी 1.30 वा. विशेष विमानाने मुख्यमंत्री हुबळीला जाणार असून धारवाड जिल्हय़ातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेऊन सायंकाळी विशेष विमानाने बेंगळूरला जाणार आहेत. दरम्यान पालकमंत्री गोविंद कारजोळ हेही मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱयाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बेळगावला येणार आहेत.
बिम्समधील भोंगळ कारभारामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. अधिकाऱयांची मनमानी, गटबाजी, नियोजनाचा अभाव, कामचुकारपणा आदींमुळे सर्वसामान्य व गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित रहात आहेत. उपचारांसाठी जाणाऱया रुग्णांना बेड नाही, असे सांगत परत पाठविण्यात येत आहे.
राज्य सरकारने या गैरकारभाराची गंभीर दखल घेतली असून वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप हे बुधवारपासून दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱयानंतर बिम्सवर इलाज होणार का? असा प्रश्न उपस्थित होत असून बिम्समधील अधिकाऱयांच्या भोंगळ कारभार व नाकारतेपणामुळे राज्य सरकार बदनाम होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बिम्सच्या आजारावर कोणता इलाज करणार याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.