ऑनलाईन टीम / मुंबई :
मानेवरील शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती सुधारत आहे. शनिवारी त्यांना डिस्चार्ज मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप ते रुग्णालयातच उपचार घेत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली.
मुख्यमंत्री ठाकरे मानेच्या दुखण्यामुळे मागील आठवडय़ात एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. काल रात्री माझी आणि मुख्यमंत्र्यांची फोनवरुन चर्चा झाली. लवकरच ते घरी परततील. त्यांनी संपूर्ण बरे झाल्यानंतर कामाला लागावे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु नये. त्यांच्यावर ज्या प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे, तो विषय नाजूक असतो. कुठेतरी नाजूक गोष्टींमध्ये कमतरता राहिली तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात, असे राऊत यांनी म्हटले आहे.