प्रतिनिधी / सातारा :
शिवसेना नेत्यांबद्दल मी बोलणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 19 बंगलोचा घोटाळा पहायला दि. 27 रोजी अलिबागला
जाणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे हजारो, करोडो रुपये लुटले जात आहेत. घोटोळे केले जात आहेत. घोटाळेबाजांना क्लिन चिट दिली जात आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात उत्तर द्यायला हिंमत नाही. ते गायब झाले आहेत. घोटाळेबाज, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात येऊन भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर साताऱ्यात निशाणा साधला.
कराडहून किरीट सोमय्या साताऱ्यात आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्याचे स्वागत केले. त्यावेळी सोमय्या तुमं आगे बढो हम तुम्हारे साथ है, ठाकरे सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलेशठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, रवी लाहोटी, प्रवीण उदुगडे-पाटील, विक्रम बोराटे, चंदन घोडके आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेचे हजारो करोडो रुपये लुटले जात आहेत. घोटाळे केले जात आहेत. त्यांना हे सरकार क्लिन चिट देत आहे. हसन मुश्रीफ यांना उत्तर द्यायला हिंमत नाही. ते गायब झाले आहेत. घोटाळेबाज मुश्रीफ यांची चौकशी सुरु झाली आहे. त्यांना जाब द्यावा लागणार आहे. मला शिवसेना नेत्यांबाबत शब्द बोलायचा नाही. 27 तारखेला उद्धव ठाकरेंचा 19 बंगलोचा घोटाळा पहायला अलिबागला जाणार आहे, अशी त्यांनी खरमरीत शब्दात टीप्पणी केली.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे रात्रीच कोल्हापूरकडे निघाले असताना त्यांच्या स्वागताला माहुली रेल्वे स्टेशनवर रात्री तीन वाजता भाजपाच्या कार्यकर्त्यांपेक्षा सातारा शहर पोलिसांचा ताफा मोठा होता. सोमवारी सकाळी 11.30 वाजता हॉटेल पर्ण येथे स्वागत भाजपाच्यावतीने करण्यात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये स्वतः शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्यासह स्ट्रायकिंग फोर्सही तैनात होती.