भाजप नेत्यांमध्ये एकमेकांना डावलण्याचे प्रयत्न
प्रतिनिधी / पणजी
गोवा विधानसभेची मतमोजणी 10 तारखेला पार पडल्यानंतर निकालाअंती भाजपने गोव्याची लढाई यशस्वीरित्या पार करत आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. मतदानाच्या काही दिवस आधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रचार सभा घेत गोव्याचं राजकारण ढवळुन काढलं असलं तरी या लढाईत काही प्रस्तापित भाजप नेत्यांचे अपवाद वगळता या लढाईत भाजपने निर्विवाद वर्चेस्व प्रस्थापित केलं आहे. यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी कोणाला – कोणते खाते मिळणार अथवा गोवा राज्याचे मुख्यमंत्रीपद कोणाकडे यावरुन आता शीतयुद्ध सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण जाहिरातीमध्ये डॉ. प्रमोद सावंत यांचा फोटो गायब झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये एकमेकांना डावलण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे.
याचीच झलक आज पुन्हा एकदा पहायला मिळाली आहे. स्थानिक वृत्तपत्रात विश्वजीत राणे यांची पत्नी डॉ. दिव्या राणे यांनी दिलेल्या जाहिरातीत डॉ. प्रमोद सावंत यांचे छायाचित्र छापण्यात आलेले नाही. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणूक लढवली गेली त्या मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे छायाचित्र जाहिरातीत नाही. यावरून प्रमोद सावंत आणि राणे यांच्यामधील शीत युद्ध पुन्हा एकदा समोर आले आहे.