बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना गेल्या २ दिवसांपासून ताप असल्याने बेंगळूरच्या रामय्या मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली होती. यावेळी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली. यावेळी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज त्यांना रामय्या मेमोरियल हॉस्पिटलमधून मणिपाल रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. याआधी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी कोरोनाची संख्या वाढत असल्याने एकूण परिस्थिती बाबत चर्चा करण्यासाठी एक तातडीची बैठक घेतली होती.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर माहिती दिली की, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रुग्णालयात दाखल केले जात आहे. मी विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करावी आणि स्वत:ला सेल्फ क्वारंटाईन ठेवावे.’