बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कर्नाटकात भाजपात सर्वकाही अलबेल नसल्याचं सध्या चित्र आहे. त्याचबरोबर येडियुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. परंतु राज्यातील काही भाजप नेत्यांनी येडियुरप्पा हेच आमचे नेते असून राज्यात मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे म्हंटले आहे. तसेच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी या सर्व बातम्यांना आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. त्यांनी जोपर्यंत पार्टी हाय कमांडचा त्यांच्यावर विश्वास आहे तोपर्यंत आपण राज्य सरकारचे नेतृत्व करत राहू, असे म्हंटले आहे. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असताना काँग्रेस नेते आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही याविषयी वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याच्या विधानामागे एक वेगळी रणनीती आहे, असे ते म्हणाले. येडियुरप्पा हे भाजप आणि राज्याच्या राजकारणातील एक मजबूत नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणुका घेत आमच्या पक्षातील आमदारांना फोडून सरकार स्थापन केले आहे, असे ते म्हणाले.