ऑनलाईन टीम / नोएडा :
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गौतमबुद्ध नगर येथे आगमन झाल्यावर दोन दिवस त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले डीसीपी ग्रेटर नोएडा झोन येथील राजेश कुमार सिंह यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यासह त्यांचा मुलगा, सरकारी वाहनाचा चालक आणि गनरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. चारही जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे डीसीपी सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासह कोरोनापासून कशा प्रकारे बचाव करायचा याबाबत जनतेमध्ये जागृती करण्याचे काम करत. रक्षाबंधन आणि बकरी ईद या सणा दरम्यान जिल्ह्यातील संमिश्र लोकसंख्या असलेल्या विभागात सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी बिलासपूर, दादरी, जेवर आदी भागांमध्ये फ्लैग मार्च केले आहे.
तसेच सरकारच्या निर्देशानुसार, त्यांनी माफिया आणि गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या पथकाचे नेतृत्व केले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी डीसीपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. शुक्रवारी त्यांच्या मुलाची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
शनिवारी त्यांच्या मुलाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डीसीपी आणि त्यांच्या सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. डीसीपी आणि त्यांच्या मुलाला ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात तर गनर आणि चालकाला नीम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.