प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसह बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हय़ातील सहकारी संस्थामार्फत सहाय्यता निधीसाठी तब्बल 57 लाख 58 हजार 600 रुपयांचा निधी धनादेशाद्वारे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा बँकेच्या कामगिरीबाबत गौरवोद्गार काढत उत्कृष्ट काम करणाऱया राज्यातील पहिल्या पाच नंबरामध्ये ही बँक आहे. तसेच सतीश सावंत यांच्या हाती बँक सुरक्षित असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हा बँकेचे संचालक बाळा गावडे, इर्शाद शेख, गुरुनाथ पेडणेकर आदींसह जिल्हा बँकेचे अधिकारी प्रमोद गावडे, कर्मचारी व सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोना विषाणूशी लढत असताना देशातील लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा बँकेमार्फत 25 लाख रुपये, जिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांकडून 7 लाख 2 हजार रुपये, जिल्हय़ातील सहकारी संस्थांकडून 12 लाख 76 हजार 600 रुपये आणि इतर काही सहकारी संस्थांनी थेट एनइएफटीमार्फत 12 लाख 80 हजार याप्रमाणे एकूण 57 लाख 58 हजार 600 रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करत असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सावंत यांनी प्रास्ताविकात सांगितले.
सहकार क्षेत्राशी संबंधीत महाविद्यालय – पालकमंत्री
पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलताना जिल्हा बँकेची मुहुर्तमेढ रोवणारे शिवरामभाऊ जाधव व रत्नागिरीचे निकम यांनी चांगल्या पद्धतीने बँक चालवली. पुढे जाऊन सावंत अतिशय समर्थपणे जिल्हा बँकेचा कारभार हाताळत आहेत. त्यामुळे राज्यातील पहिल्या उत्कृष्ट पाच बँकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश आहे, असे गौरवोद्गार काढले तर आपण उच्चशिक्षण तंत्रमंत्री म्हणून आगामी काळात सहकार क्षेत्राशी संबंधित महाविद्यालय काढणार व त्याची सर्व जबाबदारी सतीश सावंत यांच्यावर देणार असल्याचे जाहीर करत जिल्हय़ात सहकार खात्यासंदर्भात जे जे प्रश्न असतील ते मंत्रिमंडळात मांडून सोडवू, असे आश्वासन दिले.