सावर्डे मतदार संघातील संपर्क दौऱयात विविध विकासकामांचा आढावा
प्रतिनिधी/ धारबांदोडा
सावर्डे मतदारसंघातील संपर्क दौऱयाच्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आक्रमक होत विरोधकांवर शरसंधान साधले. धारबांदोडा पंचायत वगळता इतर सहाही पंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मगो नेते सुदिन ढवळीकर, माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर व विजय सरदेसाई यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला.
खाण उद्योग बंद पडण्यास माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत जबाबदार आहेत असे सांगून मागच्या सरकारने वेळीच लीज परवान्यांचे नूतनीकरण केले असते तर ही परिस्थिती ओढवली नसती, असा आरोप त्यांनी केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना इंटरनेट सेवेच्या अभावामुळे अडचणी येत आहेत. त्यालाही दिगंबर कामत व माजी मंत्री दयानंद नार्वेकर जबाबदार आहेत. मोफत पाणी योजना ही आपली संकल्पना होती, असे सुदिन ढवळीकर सांगताता. या योजनेचे श्रेय घेऊ पाहणाऱया ढवळीकरांनी 20 वर्षे बांधकाममंत्री असताना ती का राबवली नाही ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. इंटरनेट सेवेसाठी ते आझाद मैदानावर धरणे धरतात, मात्र स्वतः मंत्री असताना त्यांना आलेले अपयश लपवतात. विजय सरदेसाई हे सध्या घरात बसून सरकारवर टिका करीत आहेत. दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन हे केवळ पत्रकार परिषदा घेत असून खासदार झाल्यापासून त्यांनी किती विकासाचे प्रकल्प राबविले हे आधी सांगावे. आपला मुख्यमंत्रीपदाचा जास्तीत जास्त काळ कोरोना महामारीत गेला, त्यामुळे हव्या त्या गतीने ग्रामीण भागाचा विकास साधता आला नाही. मात्र ग्रामीण भागाच्या विकासाला खऱया अर्थाने चालना मिळाली ती भाजप सरकारच्या कार्यकाळात, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
साकोर्डा पंचायतीच्या दौऱयावेळी त्यांनी मधलावाडा साकोर्डा येथील पुरात वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली. मधलावाडा येथे होऊ घातलेल्या नवीन 1 एमएलडी पाणी प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्याहस्ते करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. शिवाय पाणी प्रकल्पासाठी जागा दान केलेल्या जमिनदारांचा सन्मान करण्यात आला. बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी माधलावाडा येथे नव्याने पूल बांधण्यात येणार असल्याचे सांगून, बारा मीटर रुंदीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. मधलावाडा येथील पाणी प्रकल्पामुळे साकोर्डा पंचायतीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मोले येथील पंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांहस्ते दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवा करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी वार्तालाप केला.
कुळे शिगांव पंचायत क्षेत्रातील गांधीनगर येथे सामाजिक सभागृहाची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आली. त्यानंतर त्यांनी नव्याने बांधण्यात येणाऱया ग्रामीण आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी करून येत्या 19 डिसेंबर पूर्वी तळमजला पूर्ण करण्याचे आदेश दिले. कुळे पंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेलया विद्यार्थ्यांचा गौरव केला. दूधसागर पर्यटन व्यवसाय उत्तम प्रकारे चालण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य अपेक्षित असून अतिथी देवो भव या उक्तीनुसार पर्यटकांचे स्वागत झाले पाहिजे, असा सल्ला दिला. दूधसागर धबधब्यावर साधन सुविधा निर्माण केल्या जाईल व हे स्थळ पर्यटन हब म्हणून विकसित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राक्षसमळ्ळीकेश्वर देवालयाजवळ होऊ घातलेल्या पाणी प्रकल्पाचे लवकरच भूमीपूजन करण्यात येणार असल्याचे बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी यावेळी सांगितले. संपर्क दौऱया दरम्यान स्थानिक सरपंच, पंचसदस्य व भाजपा मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठा संख्येने उपस्थित होते.