प्रतिनिधी/ काणकोण
स्वयंपूर्ण गोवा योजनेच्या खाली पंचायती आणि पालिकेत कार्यरत असलेले स्वयंपूर्ण मित्र आणि स्थानिक सरपंच व नगराध्यक्ष यांच्याशी काणकोणातील विकासकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी संवाद साधला. स्वयंपूर्ण मित्र तसेच सरपंच आपल्या गावच्या विकासासाठी करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या मतदारसंघातील खोतीगाव पंचायतीमध्ये विनायक वळवईकर, लोलये पंचायतीमध्ये सुभाष पागी, श्रीस्थळ पंचायतीमध्ये मिलिंद्र वेळीप, पैंगीण पंचायतीमध्ये प्रितेश फळदेसाई, गावडोंगरी पंचायतीमध्ये रमेश गावकर, आगोंद पंचायतीमध्ये सुभाष गावकर, खोल पंचायतीमध्ये ऍडविन फर्नांडिस आणि काणकोण पालिकेमध्ये एल्विस डिसोझा यांची स्वयंपूर्ण मित्र म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आठवडय़ातून दोन दिवस हे स्वयंपूर्ण मित्र संबंधित पंचायतींना भेट देऊन सरकारी योजनाची माहिती पंचायतीमधील लोकांना देत आलेले आहेत.
प्रोव्हेदोरिया, समाजकल्याण खात्यामार्फत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱया योजनांचा लाभ मिळवून देणे, गूळ तयार करणे, पापड-लोणचे तयार करणे, युवकांना वाहनचालकाचे प्रशिक्षण, पारंपरिक वैदूंना उत्तेजन देऊन त्यांना वैदू कार्ड, कृषी कार्ड, मधुमक्षिकापालन, जैवविविधता व्यवस्थापन समितीतर्फे योजना, स्थानिक शेतकऱयांना लाभ मिळावा म्हणून आठवडय़ाचा बाजार भरवून त्यांनी पिकविलेल्या वस्तूंची विक्री करण्याची व्यवस्था करणे, चटया तयार करणे यासारखे प्रशिक्षण देणे आदी माध्यमातून स्थानिकांना स्वयंपूर्ण करण्याचे काम या ठिकाणी चालू असल्याची माहिती यावेळी स्वयंपूर्ण मित्रांनी दिली.
ऑक्ट्रॉय बंद केल्याची कैफियत
लोलये-पोळे पंचायतीला देय असलेला ऑक्ट्रॉय कर सरकारने बंद केला आहे. त्यामुळे पंचायतीला आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे जीआय निधी त्वरित देण्याची मागणी सरपंच सचिन नाईक यांनी केली. तर खासगी वनक्षेत्रामुळे स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची कैफियत माजी सरपंच अजय लोलयेकर यांनी मांडली. सरकार कृषी आणि फलोत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. मात्र या ठिकाणी ज्या वस्तू पिकविल्या जातात त्यांना योग्य बाजारभाव दिला जात नाही, अशी तक्रार करून अशा शेतकऱयांना आधारभूत किंमत देण्याची मागणी माजी सरपंच भूषण प्रभुगावकर यांनी केली.
खराब नेटवर्कचा सर्वत्र परिणाम
या तालुक्यातील खोल, खोतीगाव, गावडोंगरी भागांत नेटवर्क नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांबरोबरच स्थनिक लोकांची गैरसोय होत असल्याची तक्रार खोतीगावचे सरपंच दया गावकर, गावडोंगरीच्या सुमन गावकर, खोलच्य सरपंचा पूर्णा नायक यांनी मांडली. गावडोंगरी पंचायतीत श्रीस्थळ आणि कुळगती या ठिकाणी आदिवासी कल्याण खात्यामार्फत उभारण्यात आलेल्या संस्कृती भवनांचे त्वरित उद्घाटन करण्यात यावे, अशी मागणी सुमन गावकर यांनी केली. तर खोल पंचायतीमध्ये 2006 साली बांधायला घेतलेल्या पंचायतघराच्या पहिल्या मजल्याचे काम सुरू करण्याची मागणी पूर्णा नायक यांनी केली.
पूर्णवेळ मुख्याधिकारी पुरवा ः नगराध्यक्ष
आगोंद येथील नदीतील गाळ काढण्यात यावा, जेटीची दुरुस्ती करण्यात यावी आणि 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशा मागण्या सरपंच बादल गावकर यांनी केल्या. नगरपालिकेचा कार्यालय प्रकल्प आणि मासळी मार्केटच्या कामाला सहकार्य करण्याची आणि काणकोण पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्याची मागणी नगराध्यक्ष रिबेलो यांनी केली. पैंगीणच्या पोटके मैदानाची उभारणी करण्याची मागणी पंच प्रवीर भंडारी यांनी केली, तर नगर्से ते चापोली रस्त्याचे डांबरीकरण करतानाच चार रस्ता ते बाळळीपर्यंतच्या चौपदरी रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्याची मागणी नगरसेवक हेमंत ना. गावकर यांनी केली. .
सानुग्रह अर्थ योजना विवरण प्रदान
मागच्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा कुटुंबांना गोवा सरकारने सानुग्रह साहाय्य योजनेंतर्गत प्रत्येकी दोन लाख रु. इतकी आर्थिक मदत दिलेली आहे. केंद्र सरकारची अतिरिक्त मदत यानंतर देण्यात येणार आहे, असे सांगून काणकोण मतदारसंघातील आदर्श अर्जुन वेळीप, डिसिल्डा फर्नांडिस, सिया गावकर, कविता कोमरपंत, प्रचला ना. गावकर, पांडुरंग गावकर यांना धनादेशांचे वितरण यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. तर कृषी विभागाच्या स्टॉलमध्ये शेतकऱयांना कृषी कार्डांचे वितरण केले.
गोवा प्रेस कलबचा चाणक्य पुरस्कार प्राप्त झालेले संजय कोमरपंत आणि कोकणी भाषा मंडळाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झालेले शिरीष पै यांचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, महसूल सचिव संजय कुमार उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. अक्षता भट पुराणिक यांनी केले.
भाजप युवा मोर्चाला सायकली प्रदान
उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी काणकोण मतदारसंघातील भाजप युवा मोर्चाच्या एकूण 41 जणांना सायकली प्रदान केल्या. मागाहून मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी डॉ. सावंत आणि फर्नांडिस यांची भेट घेतली आणि मामलेदार कार्यालय ते कदंब बसस्थानकापर्यंत सायकल फेरी काढली.