विधानसभा निवडणूक,कोरोना विषयी दिली माहिती : मंत्री अर्जुन मुंडा, नितीन गडकरी यांच्याशीही चर्चा
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली सविस्तर तपशील उपलब्ध होऊ शकला नसला तरी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील रणनितीबाबत चर्चा झाली. राज्यात कोरोनाचे संकट कमी झाले असून त्याची माहिती त्यांना देण्यात आली तसेच विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी कोणाला कशी द्यायची यावरही विचारविनिमय झाल्याचे सुत्रांनी सांगितले. काही ठिकाणी भाजपचेच एका पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
डॉ. सावंत यांनी उपमुख्यमंत्री बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर यांच्यासह केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जून मुंडा यांची भेट घेतली आणि गोव्यातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत (एसटी) समावेश करावा, अशी मागणी केली.
धनगर समाज शिष्टमंडळाची भेट
धनगर समाजाच्या शिष्टमंडळासही त्यावेळी नेण्यात येऊन त्यांच्यासमवेत मुंडा यांना निवेदन सादर करण्यात आले. गोव्यातील धनगर समाजाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत पडला असून तो निकालात काढा असे मंत्र्यांना सूचवण्यात आले. गोव्यातील गावडा, कुणबी, वेळीप समाजाला एसटीचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु धनगर समाजाला मात्र वगळण्यात येऊन तो दर्जा नाकारण्यात आल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणले.
प्रश्न सोडविण्याचे मुंडांचे आश्वासन
मंत्री मुंडा यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी सभापती राजेश पाटणेकर, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर, खासदार विनय तेंडुलकर यांची हजेरी होती. शिवाय धनगर समाजाच्या शिष्टमंडळात डॉ. जानू झोरे, राजन लांबोर, शांताराम सुरमे, चंद्रकांत शिंदे, बी.डी. मोटे यांचा समावेश होता.
छत्रपती संभाजी महाराजांशी भेट
डॉ. सावंत यांनी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी गोवा-महाराष्ट्र संबंध व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे मराठा इतिहास संशोधन केंद्र सुरू करावे अशी मागणी महाराजांनी डॉ. सावंत यांच्याकडे केली. तेव्हा त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी महाराजांना दिली माहिती
गोव्यात शिवराज्याभिषेक दिन, शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी त्यांना दिली. त्यावेळी स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतात असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. महाराजांनी गोव्यातील उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी डॉ. सावंत यांना राजर्षी शाहू महाराजांचा चरित्रगंथ भेट दिला.
महामार्ग बांधकामास पूर्ण सहकार्य : गडकरी
दिल्लीत राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनाही डॉ. सावंत व श्री. पावसकर भेटले. गोवा राज्यातील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम, रुंदीकरण यांची प्रगती, माहिती त्यांना कथन करण्यात आली. गडकरी यांनी रस्त्यांसाठी सर्व ते सहकार्य मदत करण्याचे आश्वासन दोघांनाही दिले.