आज भाजपश्रेष्ठींच्या भेटीसाठी प्रयत्न
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई सोमवारी दिल्ली दौऱयावर गेल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱया आमदारांनीही दिल्लीला धाव घेतली आहे. बोम्माई यांनी दोन दिवसांचा दिल्ली दौरा हाती घेतला असून सोमवारी त्यांनी कर्नाटकातील खासदार आणि आंतरराज्य जलविवादासंबंधी कायदेतज्ञांची भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी चर्चा करणार आहेत. मात्र, भेट होईल का याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे भाजप हायकमांडकडून मंत्रिमंडळ विस्ताराला मंगळवारी हिरवा कंदील मिळेल का?, याविषयी राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री बोम्माई भाजपश्रेष्ठींची भेट घेऊन मंत्रिमंडळ पुनर्रचना किंवा विस्तार, निगम-महामंडळांवरील नेमणुका तसेच राज्यातील चालू राजकीय घडामोडींबाबत चर्चा करणार आहेत. सकाळी 8 वाजता आंतरराज्य जलविवादासंबंधी राज्याच्या बाजूने युक्तिवाद करणाऱया वकिलांशी ते चर्चा करतील. या बैठकीत मेकेदाटू, कृष्णा काठ योजनेसंबंधीची अधिसूचना, केंद्रीय अर्थसंकल्पात उल्लेख असलेल्या कावेरी-पेन्नार नदीजोड योजनेविषयी देखील चर्चा होणार आहे. त्यानंतर बोम्माई केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन राज्याचा जीएसटी वाटा तसेच विविध योजनांसाठी पेंद्र सरकारकडून मिळणाऱया अनुदानाबाबत चर्चा करतील.
दिल्लीत असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी त्यांना वेळ मिळाल्यास राज्य मंत्रिमंडळ विस्तार, निगम महामंडळांवरील नेमणुका यावर चर्चा होईल. कर्नाटकाचे विधिमंडळ अधिवेशन 14 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तत्पूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करावा यासाठी अनेक आमदार दबाव आणत असल्याची बाबही ते वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देतील.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात गुंतलेल्या भाजपश्रेष्ठींकडून बोम्माईंच्या भेटीसाठी वेळ मिळेल का, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर हायकमांडची भेट न झाल्यास राज्य मंत्रिमंडळ विस्तार महिनाभर लांबणीवर पडू शकतो.
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आमदार एम. पी. रेणुकाचार्य, बसवनगौडा पाटील यत्नाळ, रमेश जारकीहोळी, सी. पी. योगेश्वर, राजूगौडा यांच्यासह इतर काही जण दिल्लीत आहेत. मंगळवारी आणखी काही आमदार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. ते पक्षश्रेष्ठींवर आपला प्रभाव पाडून मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
विविध योजनांबाबत खासदारांशी चर्चा
सोमवारी खासदारांच्या बैठकीनंतर दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, राज्यातील पाणी पुरवठा, रेल्वे, शहरविकास, बंदर, रस्ते योजनांबाबत राज्य सरकारने हाती घेतलेल्या कामांविषयी राज्यातील खासदारांशी चर्चा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडे राज्यातील विविध योजनांसाठी कोणकोणते प्रस्ताव मांडावेत याबाबत सौहार्दपूर्ण चर्चा झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी देखील बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा झालेल्या योजना राज्यात कोणत्या पद्धतीने राबवाव्यात याबाबत मार्गदर्शन केले, अशी माहिती त्यांनी दिली.
1 लाख कोटी रु. बिनव्याजी कर्ज देण्याची विनंती
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी झालेल्या चर्चेप्रसंगी 1 लाख कोटी रुपयांच्या भांडवली अनुदानातून 50 वर्षांच्या कालावधीकरिता राज्याला 1 लाख कोटी रुपये बिनव्याजी कर्जस्वरुपात द्यावेत, अशी विनंती करण्यात आली. कर्नाटकाला किती अनुदान मिळाले पाहिजे, यावरही चर्चा झाली असून अंदाजे 3800 कोटी रु. ते 4000 कोटी रुपये अनुदान मिळण्याची शक्यता आहे, असे बोम्माई यांनी सांगितले.