अंगावर धावून जाण्याचा प्रकार, पोलिसांची तारांबळ
प्रतिनिधी / सांगली
पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सोमवारी सकाळी सांगलीतील गारमेंट चौकामध्ये हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी येथे सेना-भाजप सह व्यापारीही आले होते. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा येताच निवेदन देण्यासाठी एकच झुंबड उडाली. यावेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर भाजपाचे निवेदन स्वतः मुख्यमंत्र्यांनी न घेतल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे समोरच असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा लगेच तेथून हलवला. हा गोंधळ सुमारे 15 ते 20 मिनिटे सुरू होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा गेल्यानंतरही घोषणाबाजी आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सुरू झाला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. यावेळी मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी चौकातच ठिय्या मारला.