उत्तराखंडच्या गंगोत्रीमध्ये तीर्थसिंग रावत लढविणार पोटनिवडणूक
वृत्तसंस्था /देहरादून
उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत यांना पदावर कायम राहण्यासाठी विधानसभेचा सदस्य होणे गरजेचे आहे. अशा स्थितीत राज्यात दोन रिक्त जागांपैकी एका ठिकाणी ते निवडणूक लढविणार हे निश्चित आहे. गंगोत्री येथून ते पोटनिवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. याच मतदारसंघात आम आदमी पक्षाने निवृत्त कर्नल अजय कोठियाल यांना उमेदवारी देत तीर्थसिंग रावत यांना येथून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे.
मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत सध्या विधानसभेचे सदस्य नाहीत. मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्यासाठी त्यांना 10 सप्टेंबरपूर्वी विधानसभेवर निवडून जावे लागणार आहे. उत्तराखंडमध्ये दोन जागा सध्या रिक्त आहेत. गढवाल येथील गंगोत्री तसेच कुमाऊमधील हल्दानी येथे पोटनिवडणूक होणार आहे.
गंगोत्रीला प्राधान्य
भाजपच्या एका नेत्यानुसार मुख्यमंत्री तीर्थसिंग गंगोत्रीतून निवडणूक लढवू शकतात. हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न देखील होत आहे. तेथे काँग्रेसच्या काही नेत्यांना हाताशी धरण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याची चर्चा आहे. ‘आप’ने निवृत्त कर्नल कोठियाल यांना उमेदवारी देत मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
तर गंगोत्री मतदारसंघातील संभाव्य पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार विजय पाल सजवाण यांनी चारधाम देवस्थानम बोर्डाला विरोध करणाऱया पुरोहितांना स्वतःचा पाठिंबा देत राजकीय वातावरण तापविले आहे. गंगोत्री पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री तीर्थसिंग रावत उभे राहण्याची दाट शक्यता पाहता सजवाण यांनी स्वतःच्या उमेदवारीच्या दिशेने पावले टाकली आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत गंगोत्री मतदारसंघातून भाजपचे गोपाल सिंग रावत यांनी काँग्रेस आमदार सजवाण यांना 9610 मतांनी पराभूत केले होते. पण कर्करोगामुळे त्यांचे 22 एप्रिल रोजी निधन झाले होते. तर हल्दानी येथील काँग्रेस आमदार इंदिरा हृदयेश यांचे 13 जून रोजी निधन झाले होते.