प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने मोठय़ा प्रमाणात खंडणी मागितली आहे. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली असून यासंदर्भात डॉ. सावंत यांच्या खासगी मोबाईलवर गेल्या दोन दिवसांपासून एसएमएस येत आहेत.
डॉ. सावंत यांनी याबाबत पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली असून तपासाची चक्रे वेगाने सुरू झाली आहेत. पणजी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत. जी व्यक्ती मुख्यमंत्र्यांना धमकी देत होती ती व्यक्ती बहुदा विदेशातून धमकी देत असावी, असा अंदाज आहे. या अनुषंगाने पोलीस तपास करतील. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता गेला महिना-दीड महिना सदर व्यक्ती आपल्याला धमकीवजा इशारे तसेच अपशब्दही वापरत होता. शेवटी आपण शनिवारी पोलीस स्थानकात रितसर तक्रार केली. या व्यक्तीचा पोलीस शोध घेणार असून जी कोणी व्यक्ती असेल त्याच्या विरोधात कारवाई करण्याचे सर्व अधिकार पोलिसांना देण्यात आलेले आहेत.