धडा शिकवण्यासाठी रचलेले कारस्थान अंगलट
प्रतिनिधी/ फोंडा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह चौघा राजकीय नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे मॅसेज पाठविणाऱया संशयिताला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. आशिष नाईक (25 रा. कुठ्ठाळी) असे संशयित युवकाचे नाव असून सध्या त्याला तीन दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ज्या मोबाईलवरुन त्याने हे धमकीचे संदेश पाठविले होते, तो मोबाईल संचही त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
आशिष नाईक याला सोमवारी कुठ्ठाळी येथील त्याच्या फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आले. जीवे मारण्याची धमकी देणे, खंडणीची मागणी करणे अशा विविध कलमांखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आशिष हा टॅक्सीचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या 7 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मोबाईलवर त्यांना जीवे मारण्याची व खंडणीची धमकी देणारे मॅसेज आल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो व भाजप युवा मोर्चाचे माजी नेते ऍड. प्रणव सावर्डेकर यांनाही अशाचप्रकारचे जीवे मारण्याच्या धमकीचे मॅसेज आल्याने पणजी, फोंडा, वेर्णा व कुडचडे पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. फोंडा पोलिसांनी निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी तपास करताना मोबाईल लोकेशन व अन्य तंत्रज्ञानाचा वापर करुन संशयिताला मोठय़ा शिताफिने गजाआड केले.
भूखंड व्यावहारात एका व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी संशयिताने विशिष्ट मोबाईल ऍपचा वापर करीत मुख्यमंत्री व अन्य तिघा नेत्यांना धमक्या देण्याचे हे कारस्थान रचले होते. मात्र त्याने रचलेल्या या कारस्थानात तो स्वत:च अडकल्याने त्याचे बिंग फुटले.
संशयित आशिष नाईक हा भाजपाचा कार्यकर्ता : दुर्गादास कामत
दरम्यान गोवा फॉरवर्डचे नेते व तक्रारदार दुर्गादास कामत यांनी संशयित आशिष नाईक हा भाजपाचा सक्रीय कार्यकर्ता असल्याचे सांगून भाजपाचे लोक सोशल मिडीयाचा कशाप्रकारे गैरवापर करतात हे या घटनेमुळे उघड झाल्याची टीका केली आहे. आशिष नाईक हा महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीत भाजपाच्या प्रचारात सक्रीय होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. सोशल मिडियातून विरोधकांवर दबावतंत्र वापरणे व धमक्या देणे ही भाजपाची खासियत आहे. शस्त्र म्हणून या माध्यमाचा ते वापर करतात. ईडीसी व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही पगारावर असे काही लोक आहेत. लवकरच त्यांची नावे उघड करु असा इशाराही दुर्गादास कामत यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिला आहे.