प्रतिनिधी / म्हापसा
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सकाळी म्हापसा करासवाडा येथे बार्देश तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱया मुख्य जलवाहिनीची पाहणी केली. बार्देश तालुक्याला येथून पाणी पुरवठा होत असून ही जलवाहिनी पुन्हा पुन्हा फुटत असल्याने मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन पाहणी केली व अभियंता वर्ग व कंत्राटदार यांच्याशी चर्चा करून जलवाहिनी योग्यरित्या बसविण्याबाबत सूचना केल्या.
दि. 15 व 16 एप्रिल रोजी बार्देशात संपूर्णपणे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला असून येथील जलवाहिनीची दुरुस्ती केली जात आहे. गावातील नागरिकांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली व येथील पाण्याची जलवाहिनी पुन्हा पुन्हा फुटत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांची मागणी व विचार ऐकून घेतल्या. जलवाहिनी फुटत असली तरी आता यावर दुरुस्ती करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आदार जोशुआ डिसोझा, नगरसेवक सुशांत हरमलकर आदी नागरिक अभियंता वर्ग उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी केली रस्ता, पुलाचीही पाहणी
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी करासवाडा येथे असलेल्या रस्त्याबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाच मिनिटाच्या वाटेसाठी येथील नागरिकांना भला मोठा वळसा मारावा लागतो. दोन्ही बाजूनी या पुलामुळे नागरिकांना बऱयाच समस्यांना सामोरे जावे लागते. येथे डिव्हायडरही नसल्याने सर्वीस रोडवरून मुख्य रस्त्यावर जाताना तारेवरची कसरत करावी लागते. येथे समांतर पूल उभारावा अशी मागणीही येथील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. येथील रस्ता पहिल्यांदा पूर्ण होऊ द्या नंतर यावर विचार करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना दिले.