प्रतिनिधी/ सातारा
प्रशासक म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे पदभार आला आहे. वसुली विभागाच्या नियोजित बैठकीसाठी मुख्याधिकारी अभिजित बापट हे पालिकेत आले असताना पालिकेच्या गेटवरच आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड हे त्यांना दिसले. त्यांनी राठोड यांना कामात हलगर्जीपणा वाढला आहे. सहा महिन्यापासून डीपीआरच्या फाईली प्रलंबित आहेत, हे चालणार नाही, अशा शब्दात बोलताच राठोडही बापट साहेबांच्यावर ओरडले. दोघांच्यामध्ये शब्दाला शब्द वाढत गेला. दोघांनीही एकमेकांचे व्हिडिओ चित्रीकरण एकमेकांच्या मोबाईलमध्ये कैद केले. या दोघांच्यातील वादाची सुट्टीच्या दिवशीही पालिका वर्तुळात चर्चा चांगलीच रंगत होती.
मुख्याधिकारी अभिजित बापट आणि आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड यांच्यामध्ये सकाळी सकाळीच जुगलबंदी रंगली होती. पालिकेच्या गेटमध्येच या दोघांमध्येच चांगलेच शाब्दीक युद्ध रंगले अन् दोघांनी एकमेकांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आरोग्य विभागाच्या प्रकाश राठोड यांना आरोग्य विभागामध्ये हलगर्जीपणा सुरु आहे. तो मला चालणार नाही. अनेक तक्रारी येत आहेत. घंटागाडीच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जात नाही. डीपीआरच्या फाईली सहा महिने कुठे ठेवलेल्या आहेत. तुम्हाला सापडत नाहीत. त्या शोधून माझ्याकडे सोमवारी हजर करा, अशा शब्दात सुनावताच राठोडही आक्रमक झाले. राठोड म्हणाले, साहेब तुम्हाला फक्त एकच विभाग दिसतो. आरोग्य विभागाशिवाय इतर विभाग आहेत. डीपीआरची फाईल तुमच्याच टेबलवर जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. मला नियम सांगू नका. सोलापुरपासूनच तुमचे उद्योग बाहेर काढेन. माझे सीएमपर्यंत संबंध आहेत, अशा शब्दात दोघांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली याचीच चर्चा रंगत होती.