वार्ताहर/ किणये
मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
एस. बी. पाटील यांचे मूळ गाव मुतगा असून सध्या ते वडगाव येथे वास्तव्यास आहेत. मच्छे हायस्कूल येथून आपल्या शिक्षकी सेवेला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत 35 वर्षे प्रामाणिकपणे शिक्षकीसेवा बजावली आहे. ते गणित या विषयामध्ये तज्ञ शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्यावतीने संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळय़ानिमित्त मच्छे हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. एस. बी. पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊनच त्यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.
साई भवन खासबाग येथे झालेल्या शिक्षकदिन कार्यक्रमात बेळगाव ग्रामीणचे गटशिक्षणाधिकारी जुट्टनावर, आमदार लक्ष्मी हब्बाळकर आदींच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.