कोल्हापूर जि. प. सीईओंचे सर्व खातेप्रमुखांना आदेश
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व गट विकास अधिकार्यांनी मंत्रालय स्तरावरील बैठका, शासन स्तरावरील बैठका, न्यायालयीन व इतर साक्षी, प्रशिक्षण, कार्यशाळा अथवा इतर कोणत्याही शासकीय कामकाजासाठी माझी पूर्वपरवानगी घेऊनच मुख्यालय सोडावे. तातडीच्या प्रसंगीही परवानगी मेसेजद्वारे अथवा दूरध्वनीवरून घ्यावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व खातेप्रमुख आणि सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना दिले.
जिल्हा परिषदेतील वर्ग 1 ते 4 पर्यंतचे अधिकारी, कर्मचारी हे कोणत्याही सक्षम प्राधिकार्याची पूर्व परवानगी न घेता मुख्यालयाबाहेर जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी, मंत्री, विभागीय आयुक्तांच्या महत्वाच्या ऑनलाईन व्ही.सी. बैठकांना अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होत नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या अधिनस्त असलेल्या विभागाप्रमुखांसह सर्व कार्यालय प्रमुखांनी याबाबत इतर अधिकारी व कर्मचार्यांना याबाबत सूचना द्यावी, असे आदेश सीईओ चव्हाण यांनी सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकार्यांना दिले आहेत. यापुढे सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद आहे.