ऑलिम्पिक पदकांचे दावेदार
यंदाची टोकियो ऑलिम्पिक अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपली असून भारताचे 119 ऍथलिट या जागतिक क्रीडा महोत्सवात सहभागासाठी सज्ज झाले आहेत. भारताचे पहिले पथक दि. 17 रोजी रवाना होत आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय संघातील पदकाचे प्रबळ दावेदार कोण असतील, त्यांची बलस्थाने, कमकुवत दुवे काय असतील, याचा हा संक्षिप्त लेखाजोखा…
बजरंग पुनिया (65 किलोग्रॅम)
स्ट्रेंथ ः स्टॅमिना, पॉवर, ऍटॅक
विकनेस ः लेग डिफेन्स, लवकर गुण बहाल करणे
मुख्य निकाल ः तीन वेळा वर्ल्ड मेडलिस्ट, सातवेळा आशियाई पदकविजेता
मुख्य प्रतिस्पर्धी ः ताकुतो ओटोगुरो (जपान), गॅझिमुराद रॅशिदोव्ह (रशिया), तुल्गा तूमूर ओचिर (मंगोलिया), मुस्जूकाझेव्ह (हंगेरी).
बजरंग हा जागतिक स्तरावरील मेजर फोर्स म्हणून उदयास आला आहे. मागील सर्वही 10 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तो किमान एक पदक जिंकण्यात यशस्वी ठरला असून यात 6 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्यपदकाचा समावेश आहे. सुपेरियर स्टॅमिनाच्या बळावर त्याने अनेक लढती जिंकल्या. मात्र, लेग डिफेन्स ही त्याची कमकुवत बाजू आहे. तो सर्वात अधिक तगडे प्रतिस्पर्धी असणाऱया गटात लढतो आहे. 27 वर्षीय बजरंगला प्रारंभीच आपण गुण बहाल करणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.
@ रवी दहिया (57 किलोग्रॅम)
स्ट्रेंथ ः सातत्याने आक्रमण करण्याची क्षमता
विकनेस ः प्रारंभी गुण बहाल झाल्यास कमकुवत होतो
महत्त्वाचे निकाल ः 2019 वर्ल्ड कांस्य, दुहेरी आशियाई चॅम्पियन
मुख्य प्रतिस्पर्धी ः झॅवूर उगूएव्ह (रशिया), सुलेमान अत्ली (तुर्की), युकी ताकाहाशी (जपान).
जर एखादा मल्ल फारसा प्रकाशझोतात नसेल आणि तरीही पदकाचा प्रबळ दावेदार असेल तर तो म्हणजे संयमी, शांत स्वभावाचा रवी दहिया! छत्रसाल स्टेडियमचे प्रोडक्ट म्हणून ओळखला जाणारा रवी स्लो स्टार्टर म्हणून ओळखला जातो. पण, एकदा जम बसल्यानंतर तो अजिबात मागे वळून पाहत नाही. जबरदस्त स्टॅमिना व तांत्रिकदृष्टय़ा सरस खेळ, हे त्याचे बलस्थान आहे. पोलंड ओपनमधील त्याची कामगिरी मात्र खराब राहिली.
दीपक पुनिया (86 किलोग्रॅम)
स्ट्रेंथ ः फ्लेक्झिबिलिटी, पॉवर, स्टॅमिना, ऍटॅक
विकनेस ः डिफेन्स
महत्त्वाचे निकाल ः 2019 विश्व रौप्यपदक, 2020 आशियाई कांस्यजेता.
मुख्य प्रतिस्पर्धी ः हसन याझदनी (इराण), डेव्हिड मॉरिस टेलर (अमेरिका), नैफोनोव्ह (रशिया)
कनिष्ठ ते वरिष्ठ गटात दीपक पुनियाने हळुवार प्रगती केली असली तरी टोकियो ऑलिम्पिकसाठी मात्र पूर्ण सुसज्ज तयारी करु शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. दीपक पुनिया 2020 वर्ल्डकपनंतर एकाही स्पर्धेत सहभागी होऊ शकलेला नाही. पोलंड ओपनमधून माघार घेणारा हा मल्ल अलीकडेच डाव्या हाताच्या दुखापतीवर उपचार करुन घेत होता. वरिष्ठ गटात अलीकडे खेळला नसल्याने त्याच्या फॉर्मचा अंदाज देता येणार नाही. मात्र, हेच त्याचे बलस्थानही ठरु शकते.
विनेश फोगट (53 किलोग्रॅम)
स्ट्रेंथ ः ताकद, तांत्रिकदृष्टय़ा सरस खेळ
विकनेस ः काऊंटर ऍटॅकवर गुण गमावणे
महत्त्वाचे निकाल ः 2019 विश्व कांस्य, 2021 आशियाई चॅम्पियन
मुख्य प्रतिस्पर्धी ः मायू मुकेदा (जपान)
विनेशने आतापर्यंत ज्या धडाडीने वर्चस्व गाजवले, ते पाहता ती 53 किलोग्रॅम वजनगटात सुवर्णपदकाची सहजपणे प्रबळ दावेदार म्हणून ओळखली गेली आहे. वजनगट बदलला, ही बाब तिच्या पथ्यावरच पडली असल्याचे अलीकडे दिसून आले. विनेश तांत्रिकदृष्टय़ा सरस मल्ल आहे आणि जबरदस्त ताकदीमुळे ती आणखी बलवान ठरते. काऊंटर ऍटॅकला गुण बहाल करते, ही मात्र तिची कमकुवत बाजू आहे.
सीमा बिस्ला (50 किलोगॅम)
स्ट्रेंथ ः कमबॅक करण्याची क्षमता, मेहनती.
विकनेस ः मोठय़ा स्पर्धांचा अनुभव नाही. डिफेन्स
महत्त्वाचे निकाल ः 2021 आशियाई कांस्यविजेती
मुख्य प्रतिस्पर्धी ः मारिया स्टॅडनिक (अझरबैजान), युई सासाकी (जपान).
सीमा बिस्ला यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल, अशीही अपेक्षा फार जणांना नव्हती. मात्र, तिने बल्गेरियातील वर्ल्ड क्वॉलिफायर्समध्ये धडाकेबाज खेळ साकारला. सीमा बिस्ला जिद्दी मल्ल आहे. मात्र, बडय़ा स्पर्धांचा तिला फारसा अनुभव नाही आणि ही तिची कमकुवत बाजू आहे. सीमाच्या गटात एकूण 8 प्रतिस्पर्धी आहेत आणि ती यातील एकाही प्रतिस्पर्धीवरुद्ध आजवर लढलेली नाही.
अंशू मलिक (57 किलोग्रॅम)
स्ट्रेंथ ः तांत्रिकदृष्टय़ा सरस, ऍटॅकिंग स्टाईल
विकनेस ः अनुभवाची उणीव
महत्त्वाचे निकाल ः 2021 आशियाई चॅम्पियन
मुख्य प्रतिस्पर्धी ः रिसाको (जपान), ओडुनायो (नायजेरिया), इर्याना कुराशिना (बल्गेरिया)
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता संपादन करत अंशू मलिकने नवे माईलस्टोन सर करण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. मॅटवर तिची कामगिरी मात्र खराब स्वरुपाची राहिली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्याने तिला उत्तम अनुभव मिळेल. थोडक्यात गमावण्यासारखे तिच्याकडे काहीच नसेल.
सोनम मलिक (62 किलोग्रॅम)
स्ट्रेंथ ः टेक्निक, काऊंटर ऍटॅकवर स्कोअरिंग
विकनेस ः अनुभवाची उणीव
महत्त्वाचे निकाल ः 2021 आशियाई चॅम्पियन
मुख्य प्रतिस्पर्धी ः युकाको (जपान), तिनिबेकोव्हा (किर्गिस्तान), तेबे मुस्तफा युसेन (बल्गेरिया), कायला मिरॅकल (अमेरिका)
अंशू मलिकप्रमाणेच सोनम मलिकने ऑलिम्पिक पात्रता संपादन करणे आश्चर्याचे ठरले आहे. कॅडेट लेव्हलमधून ती अचानक सिनियर सर्किटमध्ये पोहोचली आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये रिओ कांस्यविजेत्या साक्षी मलिकवर सलग 4 विजय नोंदवत तिने यापूर्वी एकच खळबळ उडवून दिली होती. अलीकडे सोनम गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार करवून घेत होती. या दुखापतीमुळेच तिच्या ऑलिम्पिक तयारीवर विपरित परिणाम होत आला आहे.