प्रतिनिधी /पणजी
आगामी 2022 विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे (सीईओ) कार्यशाळा घेण्यात आली. निवडणूक खर्च नियंत्रण देखरेख, कायदा सुव्यवस्था राखणे व व्यवस्थापन हे कार्यशाळेतील चर्चेचे प्रमुख विषय होते. निवडणुकीच्या विविध कामांसाठी नेमण्यात आलेले बहुतेक सर्व विशेष अधिकारी कार्यशाळेत हजर होते.
मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल व पोलीस खात्याचे विशेष अधिकारी राजेश कुमार यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस खाते, आयकर खाते, अबकारी खाते, अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग, कस्टम, टपाल, बँक, वाहतूक अशा विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
सीईओ कार्यालयातील विशेष अधिकारी तुषार हळर्णकर यांनी खर्च नियंत्रण देखरेख त्याची मार्गदर्शक तत्वे यांची माहिती दिली. रोख रक्कम, वस्तू साहित्य मद्य, अंमलीपदार्थ यांचे वितरण रोखण्यावर काय करता येणे शक्य आहे याचा तपशील सादर केला. कायदा सुव्यवस्था व्यवस्थापनावर आधारित उपमुख्य निवडणूक अधिकारी संगीता नाईक यांनी माहिती दिली. साहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कोटमल व इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.