वार्ताहर/ उचगाव
हलकर्णी येथे प्लंबिंगचे काम करत असताना इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. आकाश नागो वर्पे असे त्याचे नाव आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, आकाश वर्पे हा मूळ मुचंडी गावचा, मात्र लहान वयातच आई-वडील मयत झाल्याने तो वयाच्या सात-आठ वर्षापासूनच उचगाव येथील बसुर्ते फाटय़ानजीक आपल्या मामांच्या घरी तसेच सोनोली येथेही राहत होता.
आकाश हा प्लंबिंगचे काम करत होता. सदर काम हलकर्णी येथे करत असताना पाय घसरून तो खाली पडला व जबर जखमी झाला. त्याला बेळगाव येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, पण उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी सदर बातमी त्यांच्या नातेवाईकांना कळविली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात शवचिकित्सा करून रात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा मुचंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.