जत /प्रतिनिधी
मुचंडी (ता. जत) येथे शेताला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरूणाची जवळच असलेल्या शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. शिवकुमार बाबू तेली (वय 26) असे मयताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत जत पोलिस ठाण्यात मुचंडी गावचे पोलिस पाटील यांनी माहिती दिली.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिवकुमार तेली हे गुरूवारी रात्री कर्नाटक हद्दीपासून दीड किलोमीटर अंतरावर मुचंडी हद्दीत असलेल्या शेतात एकटाच पाणी पाजण्यासाठी गेला होता. शेततलावात किती पाणी आहे, हे बघण्यासाठी गेल्यानंतर शिवकुमार यांचा पाय घसरला. दरम्यान, ते शेततलावात पडले. पोहायला येत नसल्याने शिवकुमार यांचा बुडून मृत्यू झाला असून जत पोलिस घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.