प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी येथील केएलएस राजा लखमगौडा लॉ कॉलेजच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एम. के. नांबियार मुटकोर्ट स्पर्धेची रविवारी सांगता झाली. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील संघांनी भाग घेतला होता. यामध्ये पुणे येथील सिम्बॉयसिस लॉ स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला.
सांगता कार्यक्रमाला बेंगळूर येथील पीईपी विद्यापीठाचे प्रमुख प्रा. डॉ. संदीप देसाई उपस्थित होते. त्यांनी अंतिम फेरीत परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी ते म्हणाले, कायदा हा सामान्यांसाठी अवघड आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना समजेल या भाषेत त्यांना वकील कायद्याचे ज्ञान देत असतात. त्यामुळे हा व्यवसाय अधिकाधिक चांगला कसा होईल याकडे प्रत्येकाने लक्ष पुरविले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्हांचे वितरण करण्यात आले. एकूण 80 हजार रुपयांच्या रोख पारितोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले. पुणे येथील सिम्बॉयसिस लॉ स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना 30 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. तर 20 हजार रुपयांच्या पारितोषिकासह मुंबई येथील गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजने द्वितीय क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट महिला या गटात मनुस्ती तर उत्कृष्ट पुरुष या गटात श्री बालकृष्णन यांनी प्रत्येकी 10 हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. त्यांनी अशोक पोतदार बेस्ट मोटेर अवॉर्डदेखील पटकाविला. सर्वोत्तम कॉलेज म्हणून बिहार येथील सेन्ट्रा युनिव्हर्सिटीने मान मिळविला. यावेळी कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ऍड. एस. व्ही. गणाचारी, प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार, प्रा. अश्विनी परब, कश्मा भट, प्रियांका राठी, रोहित लातूर यांच्यासह इतर उपस्थित होते.