प्रतिनिधी/ बेळगाव
कडधान्य पिकावर औषध फवारणीसाठी विहिरीतून पाणी आणताना पाय घसरुन पडल्याने मुतगा येथे एका वृध्दाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. रामचंद्र बाळू पाटील (वय 63) असे त्या दुर्दैवी वृध्दाचे नाव आहे. या घटनेमुळे मुतगा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरवषी प्रमाणे रामचंद्र पाटील यांनी शेतामध्ये कडधान्य पेरणी केली होती. कडधान्य पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला म्हणून औषध मारण्यासाठी ते आणि त्यांचा मुलगा शेतात गेले. औषध फवारणी करण्यासाठी पाण्याची गरजअसते. ते पाणी विहिरीतून आणण्यासाठी ते गेले. त्यावेळी विहिरीतील पायऱयांवर शेवाळ आला होता. त्यावरुन त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत पडले.
यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला. पाणी आणण्यास गेलेले आपले वडील बराच उशीर आले नाहीत म्हणून मुलाने विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी विहिरीजवळ त्यांचे चप्पल दिसले तर घागर तरंगताना दिसली. त्यामुळे काही दुर्दैवी घटना घडली आहे म्हणून या घटनेची माहिती त्याने काकांना व घरच्यांना दिली. त्यानंतर सर्व जण घटनास्थळी दाखल झाले.
विहिरीतील पाणी काढण्यासाठी विहिरीमध्ये असलेली मोटार सुरू करण्यात आली. पाणी संपूर्ण काढल्यानंतर रामचंद्र यांचा मृतदेह दिसला. त्यानंतर या घटनेची माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आली. मारिहाळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठविण्यात आला. या घटनेची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात झाली आहे.