दहशतवादी हल्ल्याला ठरविले होते योग्य
वृत्तसंस्था/ लखनौ
फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शायर मुनव्वर राणा यांच्याविरोधात एफआयआर नोंद झाला आहे. राणा यांनी फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला योग्य ठरविले होते. हल्लेखोराजागी मी असतो तर असेच केले असते. हत्या करण्यासाठी तयार होण्याइतके कुणालाही भाग पाडू नका. हल्लेखोराला हत्येसाठी भाग पाडण्यात आल्याचे राणा यांनी म्हटले होते.
फ्रान्समध्ये काय घडले?
फ्रान्सच्या पॅरिसनजीक कॉन्फ्लांन्स सेंट होनोरिन भागात एका शिक्षकाने मागील महिन्यात वर्गात वादग्रस्त व्यंगचित्र प्रदर्शित केले होते. यानंतर हल्लेखोराने या शिक्षकाची हत्या केली होती. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेला इस्लामिक दहशतवाद संबोधिले होते. हल्लेखोर पोलिसांच्या कारवाईत मारला गेला होता. यानंतर फ्रान्सच्या नीस शहरातील चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता.