प्रतिनिधी / वास्को
पालिका निवडणुकीनंतर मुरगावात आता नगराध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. मुरगावमध्ये नगराध्यक्षपदासाठी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या गटातील दीपक नाईक व फेड्रीक हेन्रीक्स यांच्या नावांची सध्या चर्चा होत आहे. नगराध्यक्षांच्या निवडीमध्ये पालिका क्षेत्रातील तिन्ही आमदार आणि भाजपाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनाही लक्ष घालणे भाग पडणार आहे. पुढील चार दिवसांत या विषयावर अंतीम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुरगाव पालिकेत भाजपा गटाकडे सध्या एकोणीस नगरसेवकांचे भक्कम बळ आहे. शिवाय अपक्षही भाजपालाच जवळचे आहेत. एवढय़ा बहुमताच्या जोरावर मुरगाव पालिकेत प्रथम सत्ता स्थापन होणार आहे.
प्रथमच राजकीय पक्षाला विक्रमी बहुमत
पाच वर्षांत डझनभर नगराध्यक्ष निवडण्याची मुरगावची परंपरा मागच्या पाच वर्षांत खंडित झाली तरी पालिका मंडळात बहुमत असतानाही या पालिकेत काही काळ भाजपाअंतर्गंत संगीत खुर्चीचा खेळ रंगला होता. त्यामुळे पाच वर्षांत चार नगराध्यक्ष निवडले गेले होते. अविश्वास ठरावावरील राजकारण न्यायलयापर्यंत गेले होते. यंदा एकोणीस अधिक दोन असे भक्कम बहुमत असल्याने स्थिर आणि सक्षम पालिका मंडळ निर्माण होईल अशी आशा वास्कोतील नागरिकांना आहे. प्रथमच मुरगावात एखादय़ा राजकीय पक्षाच्या समर्थकांचे उमेदवार विक्रमी संख्येने निवडून आलेले आहेत.
मुरगावच्या नगराध्यक्षपदासाठी दीपक नाईक व फेड्रीक हेन्रीक्स यांच्या नावाची चर्चा
निवडणुकीच्या निकालानंतर वास्को मुरगावमध्ये सध्या नगराध्यक्षपदाच्या विषयावर चर्चा जोरात आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये अठरा नगरसेवक पालिकेत प्रथमच निवडून आलेले आहेत. तर सात माजी नगरसेवक आहेत. भाजपाच्या गटामध्ये दीपक नाईक, फेड्रीक हेन्रीक्स, दामू कासकर, यतीन कामुर्लेकर व देविता आरोलकर हे पाच जुने चेहरे आहेत. आरोलकर या विस वर्षांपूर्वी प्रथम नगरसेवक बनल्या होत्या. त्यांनी त्या काळी उपनगराध्यक्षपदही भुषवीले आहे. हे नगरसेवक अनुभवी असले तरी नगराध्यक्षपदासाठी सध्या माजी नगराध्यक्ष दीपक नाईक व नगरसेवक फेड्रीक हेन्रीक्स यांच्या नावाचीच चर्चा आहे. दीपक नाईक यांनी यापूर्वी दोन वेळा मुरगावचे नगराध्यक्षपद भुषवीले आहे. फॅड्रीक हेन्रीक्स यांनाही कार्यक्षम आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. मागच्या वेळी त्यांना नगराध्यक्षपदाने हुलकावणीच दिली होती. त्यामुळे यंदा ते नगराध्यक्ष बनण्यासाठी उत्सुक असतील यात संशय नाही. सत्ताधारी गटातील इतर नगरसेवक नवखे असल्याने नगराध्यक्षपदासाठी त्यांचा विचार होणे शक्यच नाही. उपनगराध्यक्षपदाचा विषय सुप्तावस्थेत आहे. मात्र, या पदावर एखादय़ा महिला नगरसेवकाची निवड होऊ शकते. नगराध्यक्षपदासाठी सध्या तरी दीपक आणि फेड्रीक हे दोघेच प्रमुख दावेदार आहेत.