आज होणार औपचारीक घोषणा
प्रतिनिधी / वास्को
मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी दामू कासकर व श्रध्दा महाले यांची अखेर बिनविरोध निवड झाली आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी दामू व श्रध्दा वगळता अन्य कोणीही उमेदवारी अर्ज सादर केला नाही. आज गुरूवारी सकाळी होणाऱया पालिका बैठकीत या बिनविरोध नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडणुकीची औपचारीक घोषण होणार आहे.
मुरगावच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास संपुष्टात आली. भाजपा नेत्यांनी आधीच ठरवल्या प्रमाणे दामू कासकर यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी श्रध्दा महाले यांची नावे पणजीत झालेल्या बैठकीत नगरसेवकांच्या उपस्थितीत जाहीर केली. पक्षाचा निर्णय जाहीर करण्यासाठीच या बैठकीचे आयोजन रात्री उशिरा करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड, खासदार विनय तेंडुलकर, मंत्री माविन गुदिन्हो, आमदार कार्लुस आल्मेदा, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर व इतर नेते उपस्थित होते. पक्षाचा निर्णय शिरोधार्य मानून मुरगावचे भाजपा समर्थक नगरसेवक मंगळवारी मध्यरात्री घरी परतले. बहुतेकांनी काल बुधवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरताना दामू कासकर व श्रध्दा महाले यांना साथही दिली. यंदाचे पालिका मंडळ स्थिर राहिल अशी ग्वाहीही काही नगरसेवकांनी दिली.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज सादर
मुरगाव पालिकेत भाजपाकडे 25 पैकी 19 अधिकृत नगरसेवक आहेत. अपक्ष जिंकून आलेले अन्य दोन नगरसेवकही भाजपा समर्थक असल्याने भाजपा नगरसेवकांचा आकडा 21 होत आहे. पक्षाचा आदेश पाळण्यासाठी दामू व श्रध्दा वगळता अन्य कोणीही उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्नसुध्दा केला नाही. पालिका मुख्याधिकाऱयांकडे बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत नगराध्यक्षपदासाठी दामू कासकर तर उपनगराध्यक्षपदा श्रध्दा महाले यांचेच उमेदवार अर्ज आले होते. त्यामुळे आज गुरूवारी होणाऱया पालिका बैठकीत नगराध्यक्षपदी दामू कासकर तर उपनगराध्यक्षपदी श्रध्दा महाले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात येणार आहे.
पालिका मंडळ चांगले कार्य करेल- खासदार विनय तेंडुलकर
गुरूवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करताना नगरसेवकांसमवेत खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांबाबतचा निर्णय पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊनच घेतल्याचे स्पष्ट करून हे पालिका मंडळ चांगले कार्य करून दाखवेल असा विश्वास व्यक्त केला. मुरगाव पालिका मंडळात यापूर्वी नगराध्यक्षांच्या खुर्चीसाठी बऱयाच घडामोडी घडायच्या. मात्र, प्रथमच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी सर्वजण एकत्र येण्याचा प्रकार घडून आल्याचे ते म्हणाले.