प्रतिनिधी / वास्को
मुरगाव मतदारसंघातील शेकडो मतदारांची नावे मतदार यादीतून कोणत्याही परिस्थिती गाळण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न होत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केला आहे. हे मतदार सद्या आपली नावे मतदार यादीत सुरक्षीत राहावीत यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, मुरगावच्या मामलेदार कार्यालयाकडून या मतदारांची अनेक प्रकारे सतावणुक करण्यात येत आहे. यामागे राजकारण असल्याचे आमोणकर यांनी म्हटले आहे.
मुरगाव मतदारसंघातील विशेषता बायणा भागातील जवळपास नऊशे मतदारांची नावे मतदार यादीतून गाळण्याचा प्रयत्न होत असल्याचे संकल्प आमोणकर यांनी हल्लीच राज्य निवडणुक आयोगाच्या नजरेस आणून दिले होते. मतदार यादीतून नावे गाळण्यासाठी बनावट तक्रारदारांचा वापर होत असल्याचे आमोणकर यांनी उघडकीस आणले होते. हा प्रकार राजकीय दबावातून होत असल्याचाही आरोप आमोणकर यांनी केला होता. मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयांकडेही यासंबंधी तक्रार नोंद करून त्याचा पाठपुरावा आमोणकर व त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. त्याचाच परीणाम म्हणून मुरगावच्या मामलेदारांनी मागच्या आठ दिवसांपासून यासंबंधी सुनावणी सुरू केलेली आहे. नावे गाळण्यासाठी तक्रारी आलेल्या आहेत अशा शेकडो मतदारांना या सुनावणीसाठी बोलावले जात असून मालेदार कार्यालयात गर्दी उसळत आहे. मात्र, संकल्प आमोणकर यांनी मामलेदारांकडून घेण्यात येणारी सुनावणी हा केवळ बनाव असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ज्या व्यक्तींनी केवळ भाजपाविरोधी मतदारांची नावे गाळण्याची शिफारसी केलेल्या आहेत. त्यात मृत व्यक्तीही आहेत. आणि काही व्यक्ती गोव्यातच नाहीत. मतदारांची नावे मतदार यादीतून गाळण्याची शिफारस करणाऱया या व्यक्तीनाही सुनावणीसाठी बोलावण्याची गरज होती. मात्र, त्या व्यक्तींना प्रकाशात न आणता जाणूनबुजून त्यांना सुरक्षीत ठेवण्यात येत असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला होता.
सध्या ही सुनावणी सुरू आहे. ठरल्यावेळेत न संपल्याने दिवस वाढवण्यात आलेले आहेत. बोलावण्यात आलेले मतदार आपली नावे मतदारयादीत सुरक्षीत राहावीत यासाठी मामलेदार कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहात आहेत. मात्र, त्यांना तासंतास ताटकळत ठेवण्यात येत असून काहींचे दिवस वाया जात आहेत. महिला व वृध्दांची कुचंबणा होत आहे. ही सुनावणी संथ गतीने होत आहे. मतदारांची अनेक प्रकारे सतावणुक होत आहे. या मतदारांनी वैतागून घरी जावे व नावे गाळण्याची वाट मोकळी व्हावी असा हेतून या सतावणुकीमागे असल्याचा संशय संकल्प आमोणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी सकाळी आमोणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अन्याय व सतावणुकीचा पुन्हा निदर्शनास आणून दिला. सुनावणीस हजर राहणारे मतदार आपल्याकडील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बील, पॅन कार्ड असे बरेच अधिकृत दस्तावेज सादर करीत असताना ज्या घरात राहता त्या घरमालकाची नोटरी केलेले परवानगी पत्रही सादर करण्याची सक्ती केली जात आहे. जे कायदय़ाने सक्तीचे नाही त्याबाबत आग्रह धरला जात आहे. घरमालकाची नोटरी केलेली परवानगी सादर न केल्यास मतदारांना माघारी पाठवले जात आहे. गोव्यात कुठेच असा प्रकार घडत नसून केवळ मुरगाव मतदारसंघात घडत आहे असे स्पष्ट करून मतदारांना बोलावून घेऊन सुनावणी घेण्याचा केवळ फार्स करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत शेकडो नावे मतदार यादीतून गाळली जावे यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न होत असल्याचे संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे.