मूर्ती पोलीस स्थानकात : मंडपासंबंधी काही वर्षांपासून वाद
प्रतिनिधी / वास्को
पालिकेने नोटीस बजावलेल्या मंडपात गणेश मूर्तीची स्थापना करण्याचा हेडलॅण्ड सडा भागातील काही व्यक्तींचा प्रयत्न प्रशासनाने हाणून पाडला. असा बेकायदा प्रकार घडवून आणल्या प्रकरणी मुरगाव पोलिसांनी भटजीसह अन्य तिघांना अटक केली. हा मंडप गेल्या काही वर्षांपासून राजकीय वादातून वादग्रस्त ठरला होता.
अधिक माहितीनुसार मुरगावातील हेडलॅण्ड सडा नाक्यावरील मुरगावचा राजा म्हणून ओळाल्या जाणाऱया मंडपात नवीन गणेश मूर्ती स्थानापन्न करण्याची तयारी सडय़ावरील काहींनी सुरू केली होती. चार पुरोहितांच्या साक्षीने नवीन मूर्तीची पुजाअर्चाही करण्यात आली. मात्र, ही माहिती लगेच एमपीटीचे अधिकारी, मुरगाव पालिका, उपजिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांना कळल्याने या प्रशासकीय पथकाने लगेच घटना स्थळी धाव घेऊन या कार्यात हस्तक्षेप केला. त्यामुळे त्या मंडपात श्।ाr गणेश मूर्तीचे कायमसाठी विविधत स्थापना करण्याचा प्रयत्न फसला. यावेळी उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई, मुख्याधिकारी गौरीष शंखवाळकर, पोलीस निरीक्षक परेश नाईक, संयुक्त मामलेदार हिरेंद्र बाणावलीकर, मुरगाव पालिका व मामलेदार कार्यालयाचे इतर अधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार मुरगावच्या पोलिसांच्या मदतीने ती मूर्ती ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणण्यात आली.
धार्मिक भावना ओळखूनउरकली उत्तर पुजा
मात्र, त्यापूर्वी प्रशासकीय अधिकाऱयांनीही धार्मिक भावनांची दखल घेऊन त्या गणेश मूर्तीची उत्तर पूजाही पार पाडली. या उत्तर पुजेसाठी पोलिसांनी मूर्तीची पुजा केलेल्या त्या चार भटजीपैकी एका भटजीला शोधून आणले व त्यांच्याकडूनच उत्तर पुजा करून घेतल्याची माहिती मिळाली.
काही वर्षांपासून वादात सापडला आहे गणेश मंडप
हेडलॅण्ड सडय़ावरील सदर मंडपात दरवर्षी मुरगावचा राजा हा सार्वजनिक गणेशोत्वस साजरा केला जातो. त्यानिमित्त या ठिकाणी विविध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केले जातात. गणेशोत्सव वगळता वर्षांतील इतर दिवस मात्र हा मंडप खुलाच असतो. साधारण तीन वर्षांपूर्वी या मंडपातील गणेश सजावट काढून टाकण्याच्या पालिकेच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. पालिकेने अखेर ती सजावट काढून टाकली होती. या मंडपात गैरप्रकारही घडत असल्याचे आरोप यापूर्वी स्थानिक आमदार व मंत्री मिलिंद नाईक व त्यांच्या समर्थकांनी केलेले आहेत. याच पाश्वभूमीवर या मंडपासंबंधी अनेकदा वाद उफाळून आलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुरगाव पालिकेने सदर मंडप हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे हा वाद सध्या न्यायप्रविष्ठ ठरलेला असून यासंबंधी सुनावणीही ठेवण्यात आलेली आहे.
नोटीस बजावल्यानंतरही गणेश मूर्ती स्थानापन्न करण्याचा प्रयत्न, चौघांना अटक
ज्या हेडलॅण्ड सडय़ावरील नाक्यावर हा मंडप उभा आहे, ती जमीन आपली असल्याचा दावा एमपीटीने केलेला असून एमपीटीने तो मंडप बेकायदा ठरवून त्याच्याविरूध्द कारवाई करावी यासाठी मुरगाव पालिकेकडे तक्रार केलेली आहे. या तक्रारीनंतर मुरगाव पालिकेने त्या मंडपावर कारवाईची नोटीस लावली आहे. मात्र, त्याही परिस्थितीत ज्यांना त्या मंडपात गणेशाची मूर्ती स्थानापन्न करायची होती, अशा काही जणांनी मंगळवारी दुपारी पुजा अर्चा घडवून आणली. मात्र, शासकीय तत्परतेमुळे हा प्रयत्न फसला. या प्रकरणी मुरगाव पोलिसांनी भटजीसह सुरज चोडणकर व अन्य दोघांविरूध्द गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.