प्रतिनिधी / वास्को
पालिका निवडणुकीसाठी मुरगाव पालिका क्षेत्रात ईच्छुक उमेदवारांची जय्यत तयारी सुरू आहे. गटातटाच्या राजकारणाला वेग आलेला आहे. ही निवडणुक पक्षीय पातळीवर होणार नसल्याने राजकीय गॉडफादरवरच उमेदवारांची सारी भिस्त आहे. राखीव प्रभाग जाहीर होत नसल्याने मोठी अडचण बऱयाच ईच्छुकांना सतावत आहे. सर्वच ईच्छुकांमध्ये सुप्त भिती आणि चिंता आहे. एका सत्ताधारी गटाने मात्र, उघडपणे प्रचार चालवल्याने विरोधकांमध्ये आश्चर्य पसरलेले आहे. विद्यामान पंचवीस नगरसेवकांपैकी वीस नगरसेवक पुन्हा निवडणुक लढवण्यास ईच्छुक आहेत.
गोव्यातील अकरा पालिकांच्या निवडणुका एप्रिल अखेरपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ईच्छुक उमेदवारांनी जय्यत तयारी चालवलेली आहे. मात्र राखीवता जाहीर होणार असल्याने त्यांच्या उत्साहावर निर्बंध येत आहेत. पुन्हा नगरसेवक बनण्याची सुप्त ईच्छा बाळगून असलेल्या आजी माजी नगरसेवकांबरोबरच नवसमाजसेवक आणि हवसे गवसे नवसे असे बरेच ईच्छक निवडणुक रिंगणात उतरू पाहात आहेत. मात्र, पालिका क्षेत्रातील राखीव प्रभाग सरकारने अद्याप जाहीर केलेले नसल्याने या ईच्छुक उमेदवारांसमोर मोठी अडचण उभी राहिलेली आहे.
पंचवीसपैकी वीस विद्यामान नगरसेवक पुन्हा लढण्यास उत्सुक
मुरगाव पालिका अ दर्जाची पालिका आहे. मागच्या निवडणुकीवेळी या पालिका क्षेत्रातील प्रभागांची रचना बदलण्यात आली होती. नगरसेवकांची संख्या वीसवरून पंचवीस करण्यात आली होती. या निर्णयावर त्यावेळी टीकाही झाली होती. नगरसेवकांची संख्या वाढवण्यापेक्षा पालिका कर्मचाऱयांची संख्या वाढवावी अशी मागणी त्यावेळी नागरिकांकडून झाली होती. यंदा नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता नसली तरी सरकारकडून प्रभागांची मोडतोड होण्याची भिती ईच्छुक उमेदवारांना सतावत आहे. मुरगाव पालिका क्षेत्रासाठी ईच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असली तरी प्रभागांमध्ये होऊ शकणारा फेरफार तसेच राखीवतेचा प्रश्न असल्याने सर्वांमध्ये साशंकता आणि चलबिचल आहे. विशेष म्हणजे मुरगाव विद्यमान पंचवीस नगरसेवकांपैकी वीस नगरसेवकांनी पुन्हा निवडणुक रिंगणात उतरण्याची तयार केलेली आहे. त्यांना आतापासूनच विजयाची खात्रीही वाटू लागलेली आहे. मुरगावच्या दोघा नगरसेवकांना आता नगरपालिका निवडणुका नकोशा झाल्या आहेत. त्यांनी आमदारकीचे ध्येय बाळगलेले आहे. या पालिका निवडणुकीच्या पडदय़ाआडून ते विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. ते आता ईच्छुक उमेदवारांचे गॉडफादर बनलेले आहेत. त्यामुळे यंदा मुरगाव पालिका क्षेत्रात उमेदवारांच्या राजकीय गॉडफादरची संख्या वाढणार आहे. एका नगरसेवीकेला यंदा तीच्या गॉडफादरकडून पालिका निवडणुकीपासून दूर ठेवले जाणार आहे. मांगोरहिलचे लोकप्रीय नगरसेवक पास्कॉल डिसोजा यांचे निधन झालेले आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी एक दोन बलाढय़ नगरसेवकांचा पत्ता कट करण्याच्याही राजकीय हालचाली चालू असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीमुळे काही ईच्छुक उमेदवारांनी दोन दोन प्रभागांमध्ये पाऊल ठेवलेले आहे. इथे नाही तर तीथे नशीब आजमावण्याचा काही ईच्छुक उमेदवारांचा प्रयत्न आहे. यंदा एक पत्रकारही पालिका निवडणुक रिंगणात उतरणार आहे. मागच्या दोन वर्षांपासून त्यांची तयारी सुरू आहे. एक माजी पत्रकारही निवडणुक लढवण्यासाठी उत्सुक असून राखीव प्रभागांची मांडणी जाहीर झाल्यानंतरच त्यांची निश्चित भूमीका स्पष्ट होणार आहे. या दोघाही आजी माजी पत्रकारांनी एका राजकीय गटाशी संधान बांधलेले आहे.
प्रभाग जाहीर होण्यापूर्वीच काहींचा उघडपणे प्रचार
प्रभाग राखीवता जाहीर होणार असल्याने ईच्छुक उमेदवार सबुरीनेच पावले टाकीत असले तरी मुरगाव पालिका क्षेत्रात एका सत्ताधारी गटाचे बरेच उमेदवार उघडपणे प्रचाराला लागल्याचे बोलले जात आहे. राजकीय गॉडफादरच्या आदेशानुसारच हे उमेदवार प्रचाराला लागलेले आहेत. यांचे प्रभाग कोणी जाहीर केले असा प्रश्न इतर ईच्छुक उमेदवारांना सध्या पडलेला आहे. सध्या गटा तटाचे राजकारण वेग घेत आहे. राजकीय गॉडफादरकडून उमेदवारी नाकारली जाणार असल्याच्या शक्यतेने काही जण दुसऱया राजकीय गटाशी हातमिळवणी करू लागलेले आहेत. मुरगाव पालिका क्षेत्रात वास्को, मुरगाव व दाबोळी मतदारसंघाचा काही भाग येतो. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो व आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यावर भाजपाच्या विजयाची मदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप डिसोजा, काँग्रेसचे संकल्प आमोणकर आणि इतर गटांचेही उमेदवार मुरगावच्या पालिका निवडणुक रिंगणात दिसून येतील. प्रभाग राखीवता जाहीर झाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
सत्तेचा गैरवापर करून निवडणुक लढवण्याचा हक्क डावलण्याचा प्रयत्न होऊ नये- जुझे फिलीप
माजी महसुलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जुझे फलिप डिसोजा यांनी पालिका निवडणुका पक्ष पातळीवरसुध्दा लढवण्याची पक्षाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. अन्यथासुध्दा आपल्या पॅनलचे उमेदवार रिंगणात असतील. काही ठिकाणी तडजोड म्हणून समविचारी उमेदवाराला पाठींबा देण्यात येईल. मात्र, अद्याप प्रभाग राखीवता जाहीर झालेली नसल्याने आपले कार्यकर्ते उघडपणे बाहेर पडलेले नाहीत. मात्र, सत्ताधाऱयांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून ईच्छुक उमेदवारांना निवडणुक लढवण्यापासून वंचीत ठेवण्याचा प्रयत्न करू नये. आपण मंत्री असतानासुध्दा आपल्या प्रबळ विरोधकांविरूध्द पालिका निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केला नव्हता. रोटेशन पध्दतीने राखीवता चालू राहायला हवी. सरकार ही राखीवता जाहीर करण्यासाठी का घाबरते हेच कळत नाही. आपले विरोधक पालिका निवडणुकीसाठी कोणत्या हालचाली करतात यावर सध्या सरकारने लक्ष केंद्रीत केलेले आहे. विरोधकांच्या हालचाली टिपूनच सरकारने निर्णय घेण्याची शक्यता जुझे फिलीप यांनी व्यक्त केली.
निवडणुक लढवण्यासाठी आपल्या पॅनलचे उमेदवार सज्ज- संकल्प आमोणकर
गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनीही पालिका निवडणुकीत सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त केली. आपल्या उमेदवारांची यादी तयार आहे. काय झाल्यास काय करावे याचीही तयार करून ठेवलेली आहे. मात्र, गैरनिर्णय रोखण्यासाठी न्यायालयाचा आधार घ्यावा लागल्यास तोही घेण्यात येईल असे संकल्प आमोणकर म्हणाले. मुरगावात होत असलेल्या राजकीय हालचाली पाहता सत्ताधारी गट सध्या ईच्छुक उमेदवारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला.