रविवारी उमेदवार राहिले प्रचारात व्यस्त आज उमेदवारांची भाऊ गर्दी होण्याची शक्यता
प्रतिनिधी / वास्को
मुरगावात तीन दिवसांत केवळ 19 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. मात्र, प्रचारार्थ अनेक पटीने उमेदवार बाहेर पडलेले असून काल रविवारचा दिवस या उमेदवारांनी गल्लोगल्ली प्रचार करण्यात घालवला. बहुतेक उमेदवार आज सोमवारच्या मुहुर्तावर उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आजपासून चार दिवस शिल्लक आहेत.
मुरगाव पालिका निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घाई केलेली नाही. मात्र, त्यांनी प्रचार कार्य जोरात चालवले आहे. बुधवार, गुरूवार व शनिवार अशा तीन दिवसांत केवळ 19 उमेदवारांनी मुरगाव पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरले. आज सोमवार शुभ दिवस मानण्यात येत असल्याने वास्कोतील बरेच उमेदवार आज मुरगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात भाऊ गर्दी करण्याची शक्यता आहे. रद्द झालेल्या निवडणुक प्रक्रिये वेळी 133 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शेवटी 112 उमेदवार रिंगणात राहिले होते. ऐवढेच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. बहुतेक उमेदवारांनी यापूर्वीच प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. काहींनी प्रचार कार्यालयेही उघडलेली आहेत. या उमेदवारांनी घरोघरी प्रचारावरच भर दिलेला असून बहुतेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच पहिल्या फेरीतील प्रचार पूर्ण केला आहे.
रविवारी उमेदवार प्रचारात राहिले व्यस्त
काल रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने उमेदवारांनी प्रचार कार्यात झोकूनच दिले होते. रात्री आठनंतर उमेदवारांनी प्रचार आवरता घेतला. अनेक उमेदवारांनी रात्री उशिरापर्यंत आपल्या कार्यकर्त्यासमवेत बैठकांचाही सपाटा लावलेला आहे. बहुतेकांनी प्रचार कार्याला जोर लावलेला असला तरी अनेक ईच्छुक उमेदवार अजूनही चाचपडत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मुरगावच्या पालिका निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा सुरक्षा मंच यांच्या पॅनलसह अपक्ष उमेदवारही मोठय़ा संख्येने प्रचार कार्यात व्यस्त आहेत. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या समर्थकांचे भाजपा पॅनल नुकतेच जाहीर झालेले आहे. अन्य कुणी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काँग्रेसचे संकल्प आमोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुझे फिलिप डिसोजा आणि येत्या विधानसभा निवडणुकीचे वास्कोतील उमेदवार दाजी साळकर यांचेही समर्थक निवडणुक रिंगणात आहेत. अधिकृत पॅनलशिवाय यंदा मुरगावच्या पालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारही महत्वाची भुमीका बजावणार आहेत. बायणातील माजी नगरसेवक लियो रॉड्रिक्स दाबोळीतील प्रभागातून अपक्ष निवडणुक लढवणार आहेत. सडय़ावरील एक माजी नगरसेविकाही दाबोळीतील प्रभागातून अपक्ष निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे. अपक्षांचीही या निवडणुकीत महत्वाची भुमीका असेल.
मुरगाव, वास्को, दाबोळीच्या नेत्यांमध्ये समेट की नाईलाज
पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री मिलिंद नाईक यांच्या विरोधात मंत्री माविन गुदिन्हो आणि आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दंड थोपटले होते. पालिका प्रभाग आरक्षण प्रश्नात घोळ घातर्ल्याचा आरोप करून मंत्री नाईक यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी या नेत्यांनी केली होती. त्यामुळे आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र, भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष व इतर राज्यस्तरीय नेत्यांनी मुरगावातील या तीन नेत्यांमध्ये समेट घडवून आणलेला आहे. आता मुरगावातील मंत्री व आमदारांमध्ये कोणतेही मतभेद राहिलेले नसल्याचे पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हा समेट होता की त्या मंत्री आमदारांचा नाईलाज होता हे लवकरच स्पष्ट होणार आहे. भाजपाने मुरगावसाठी पंचवीसपैकी आपल्या चोवीस उमेदवारांची नावे जाहीर केलेली असली तरी काही प्रभागांमध्ये भाजपाचेच डमी उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून त्यांना स्थानिक नेत्यांचाच छुपा पाठींबा असल्याचा संशय व्यक्त होऊ लागलेला आहे. त्यामुळे काही विशिष्ठ प्रभागांमध्ये भाजपा विरूध्द भाजपा असेही चित्र दिसणार आहे. काही उमेदवार पक्षाने अन्याय केल्याच्या भावनेने अपक्ष निवडणुक लढवणार आहेत.
निवडणुकीच्या महोलात कोरोना संसर्गाची चिंता दरम्यान, सध्या निवडणुक प्रचार कार्याला गती आल्याने निवडणुकीचा माहोल तयार झालेला आहे. यात कोरोना संसर्गानेही डोक वर काढल्याने चिंता दिसून येत आहे. प्रचारासाठी उमेदवार सध्या गटा गटाने फिरत आहेत. प्रचार कार्यकर्त्यांच्या घोळक्यांमुळे जमाव बंदीचे उल्लंघन होत आहे. हा प्रकार कोरोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक असला तरी निवडणुकीच्या माहोलात या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.