प्रतिनिधी / वास्को
मुरगाव तालुका मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्याच मागे राहिलेला आहे. एकेकाळी वास्को मतदारसंघातून भाजपाने मुरगाव तालुक्यात आपले खाते खोलले होते. आज तालुक्यातील चारही मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. त्यात दोघे मंत्री आहेत. तालुक्यातील बहुतेक सर्व पंचायती, जिल्हा पंचायत सदस्य आणि मुरगाव नगरपालिकेवरही भाजपाचेच पूर्ण वर्चस्व आहे. येत्या सहा महिन्यांत होणाऱया विधानसभा निवडणुकांमध्ये हे वर्चस्व कायम राहिल असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना वाटत असला तरी चारपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपाला धोका असल्याचे सर्वसामान्य मतदारांमध्ये बोलले जात आहे.
मागच्या सहा महिन्यात जिल्हा पंचायत आणि पालिकांच्या निवडणुका गोव्यात पार पडल्या. जिल्हा पंचायत आणि पालिका निवडणुकांमध्येही भाजपाने भरीव यश प्राप्त केल्याने विधानसभेसाठी उपांत्यपूर्व फेरी जिंकल्याचे भाजपाच्या नेत्यांना वाटल्यास नवल नाही. भाजपाच्या या यशात मुरगाव तालुकाही सहभागी झाला होता. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यात पुन्हा भाजपाचेच भाग्य उजळेल असे त्यांचे नेते आणि कट्टर भाजपा समर्थकांना वाटत आहे. मात्र, हे खरेच शक्य आहे काय याचे उत्तर येणाऱया काळात मिळणारच आहे. सध्या तरी भाजपाच्या दाव्याना विरोधक सोडाच, स्वपक्षीय कार्यकर्त्यानाही संशय आहे. वाढती महागाई निवडणुकीचा मुद्दा बनेलच शिवाय कोरोनाने सरकारची उडवलेली धुळदाणही भाजपाला डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. रेल्वेचे दुपदरीकरण कुठ्ठाळीतील विशिष्ठ लोकांना मान्य नाही. त्यामुळे इथे भाजपावर किंचित परीणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को व मुरगाव अशाही चारही मतदारसंघात भाजपाचे मंत्री आमदार असले तरी तालुक्यातील या नेत्यांमध्ये उघड मतभेदही आहेत. हे मतभेद कधी सुप्त असतात तर कधी उफाळूनही येतात. हे मतभेदही भाजपाच्या यशाच्या आड येऊ शकतात. अलिकडच्या काळात कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांनी विविध प्रश्नावर पक्ष आणि सरकारच्या विरोधात सूर आळवलेला आहे. त्यामुळे त्यांचे पुढील नियोजन काय असेल, पक्ष त्यांच्याबाबतीत काय विचार करत असेल हे येणाऱया काळातच उघड होईल. वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, दाबोळीचे आमदार व वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो तसेच मुरगावचे आमदार व नगरविकासमंत्री मिलिंद नाईक हे पक्षाशी एकनिष्ठ आहेत. आपल्या मतदारसंघांवर पालिका निवडणुकीत वर्चस्वही राखलेले आहे. त्यामुळे त्यांच्याच जीवावर भाजपा पुन्हा हे गड काबीज करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
2017 च्या निवडणुकीत मिळवले होते अभुतपूर्व यश
भाजपाने मुरगाव तालुक्यात वास्कोतून 2002 साली प्रथम खाते खोलले होते. माजीमंत्री राजेंद्र आर्लेकर वास्कोतून आमदार बनले होते. त्यानंतर 2007 मध्ये मंत्री मिलिंद नाईक यांनी मुरगाव मतदारसंघात भाजपाच्या झेंडा फडकावला. मात्र, वास्कोत भाजपाला जागा गमवावी लागली. तीथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुझे फिलिप यांनी दुसऱयांदा विजय प्राप्त केला. कुठ्ठाळीत माविन गुदिन्हो यांनी पुनरागमन केले. 2002 मध्ये युगोडेपाच्या माध्यमातून स्व. माथानी साल्ढाना यांनी कुठ्ठाळीत विजय मिळवला होता. तर माविन गुदिन्हो यांना हार पत्करावी लागली होती. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत माविन गुदिन्हो यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर दाबोळीतून निवडणुक लढवली. त्या परिवर्तनाच्या लाटेत माविन गुदिन्हो थोडक्यात वाचले. कुठ्ठाळी, वास्को आणि मुरगावमध्ये भाजपाचे माथानी साल्ढाना, कार्लुस आल्मेदा आणि मिलिंद नाईक यश प्राप्त केले. त्यात मिलिंद नाईक यांनी दुसऱयांदा आमदार होऊन मंत्रीपदाचाही मान मिळवला. मुरगाव तालुक्यात भाजपाने प्रथमच असे यश प्राप्त केले होते. 2017 च्या मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विक्रमच केला. कोणतीही लाट नव्हती उलट प्रस्थापीत आमदारांविरूध्द नाराजीचा सूर असतानाही कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आणि मुरगावमध्ये भाजपाने विजय प्राप्त केला. जवळपास पाचशे मतांच्या फरकाने एलिना साल्ढाना दुसऱयांदा विजयी झाल्या. माविन गुदिन्हो दाबोळीतून मोठय़ा मताधिक्क्याने भाजपाचे आमदार बनले. वास्कोत कार्लुस आल्मेदा यांनी दुसऱयांदा समाधानकारक यश प्राप्त केले. मात्र, मिलिंद नाईक मुरगावमधून जवळपास 140 मतांच्या अल्प फरकाने तिसऱयांदा आमदार बनण्यास यशस्वी ठरले.
तिन मतदारसंघात भाजपाला आव्हानात्मक स्थिती
पुढील विधानसभा निवडणुका पुढील सहा माहिन्यात येतील. मागच्या वर्षभरातील निवडणुकांमध्ये मिळालेले यश आणि कार्यकर्त्याचे भक्कम संघटन यांच्या जोरावर मुरगाव तालुक्यात पुन्हा यश मिळवण्यासाठी भाजपा आशावादी आहे. मात्र, यंदा परिस्थिती फारच वेगळी आहे. मनोहर पर्रीकरांचे बळ आता नाही. मोदींचा करीश्माही कामी येण्याची शक्यता नाही. जिल्हा पंचायत आणि पालिका पातळीवर जरी यश मिळवले तरी विधानसभा निवडणुकीत मतदार आपला दृष्टीकोन बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाची जमेची बाजू म्हणजे असंघटीत काँग्रेस पक्ष. मुरगाव मतदारसंघ वगळता अन्य तीन्ही मतदारसंघात काँग्रेसचे संघटन नाही. दाबोळी, वास्को व कुठ्ठाळीसाठी काँग्रेसकडे आश्वासक चेहराही नाही. या तिन्ही मतदारसंघात या पक्षाचे कार्यही दिसत नाही. ऐन निवडणुकीच्या वेळीच काँग्रेसची जमवाजमव सुरू होईल असे वाटते. वास्कोत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोजा निवडणुक रिंगणात उतरतील यात शंकाच नाही. सतत दोन वेळा हरले तरी त्यांचे अस्तित्व वास्कोत अद्यापही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची युती झाल्यास त्यांच्या उमेदवारीला बरेच बळ येईल. दाजी साळकर हे सुध्दा महत्वाचे प्रतिस्पधी असतील. संकल्प आमोणकर काँग्रेसचे मुरगावात प्रबळ उमेदवार असतील. वास्को आणि मुरगावात भाजपाला विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागण्याची शक्यता आहे. दाबोळीत सध्या तरी भाजपाला दिलासादायक चित्र आहे. कुठ्ठाळीत विजय मिळवणे भाजपाला आव्हानच ठरणार असल्याने आमदार एलिना साल्ढाना यांच्याबाबत पक्ष फेरविचार करू शकतो. जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार अँथनी वास यांना भाजपाने पाठींबा दिला होता. भाजपा त्यांना आपल्या जाळय़ात ओढण्याची शक्यता नाकारता येत नाही.