प्रतिनिधी/ वास्को
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी गुरूवारी संध्याकाळी मुरगावच्या पाणी पुरवठा समस्येबाबत नगरविकासमंत्री मिलिंद नाईक व शासकीय अधिकाऱयांसमवेत चर्चा व पाहणी केली. जायकाची जलवाहिनी जोडून येत्या तीन ते चार महिन्यात येथील पाण्याची समस्या पूर्णपणे सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मुरगाव तालुक्यातील काही भागात पाण्याची किरकोळ समस्या भेडसावत आहे. हेडलॅण्ड सडय़ावरील पाणी पुरवठा मागच्या सात आठ वर्षात बऱयाच प्रमाणात सुरळीत झालेला असला तरी हा भाग उंचावर असल्याने अद्यापही काही तांत्रीक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जुनी वाहिनी जीर्ण झालेली आहे. कमी दाबाने पुरवठा होत आहे. तसेच जायकाचा पाणी पुरवठाही मुरगाव तालुक्याला अद्याप लाभलेला नाही. वेर्णा अद्योगिक वसाहतीपुढे हा जल पुरवठा अद्याप पोहोचलेला नाही. वेर्णापासून मुरगावच्या देस्तरो बायणा व पुढे हेडलॅण्ड सडय़ापर्यंत या जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, दाबोळीतील अडचणीमुळे पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही.
सात वर्षांपासून जलवाहिनी जोडण्याचे काम रेल्वेमुळे रखडले
वेर्णापासून हेडलॅण्ड सडापर्यंत जायकाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले तरी दाबोळीतील महामार्गाखालील रेल्वेमार्गामुळे जवळपास पंचवीस मिटरची वाहिनी जोडण्याचे काम अडलेले आहे. या ठिकाणी जलवाहिनीसाठी रेल्वे कटींगवर पुल बांधण्याची गरज आहे. त्याला रेल्वेच्या परवानगीची गरज होती. सहा वर्षे रेल्वेडकून या कामाला मंजूरी मिळाली नव्हती. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्र्यासमोर ही समस्या मांडताच रेल्वे या कामासाठी परवानगी दिली आहे. मागच्या डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झालेली असून आता या रेलमार्गावर पुल उभारणेच बाकी आहे. हे काम झाल्यावर मुरगाव तालुक्यासाठी जायकाचे पाणी उपलब्ध होणार आहे. हेडलॅण्ड सडय़ापर्यंत हे पाणी जाणार असल्याने सडय़ावरील उरली सुरली समस्याही संपुष्टात येणार आहे.
रेलमार्गावर जलवाहिनीसाठी पुल उभारून चार महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी मुरगावचे आमदार व नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी केलेल्या विनंतीनुसार गुरूवारी संध्याकाळी मुरगावला भेट देऊन ही समस्या जाणून घेतली. बायणातील रविंद्रभवनमध्ये त्यांनी मंत्री मिलिंद नाईक व पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी नगरसेवक मुरारी बांदेकर, शशिकांत परब, संजय सातार्डेकर व इतर कार्यकर्तेही उपस्थित होते. मंत्री मिलिंद नाईक यांनी मुरगाव मतदारसंघातील पाणी पुरठा सुरळीत करण्यासाठी आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती तसेच पाणी पुरवठय़ातील काही अडचणींचीही पावसकर यांना दिली. जायका जलवाहिनी व रेल्वेमार्गावरील अडचणीचीही त्यांना माहिती देण्यात आली. यावेळी मंत्री पाऊसकर यांनी रेलमार्गावर जलवाहिनी घालण्यासाठी पुलाचे काम हाती घेण्यात येईल असे स्पष्ट करून येत्या तीन ते चार महिन्यात जायकाचे पाणी मुरगाव तालुक्याला उपलब्ध करण्याचेही आश्वासन दिले.
हेडलॅण्ड सडासाठी आणखी बुस्टरची सोय
हेडलॅण्ड सडय़ावर पाणी खेचण्यासाठी बुस्टरची मदत घेण्यात येते. जायकाचे पाणी खेचण्यासाठी अन्य दोन बुस्टरची सोय करण्याचेही आश्वासन मंत्री पाऊसकर यांनी उपस्थितांना दिले. सडय़ावर पाण्याच्या दोन नवीन टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. मात्र, जुन्या टाकीच्या बदल्यात अन्य एक टाकी उभारण्यासाठी मंत्री मिलिंद नाईक यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे. त्याचाही पाठपुरावा करण्याचे आश्वासन मंत्री पाऊसकर यांनी दिले. मंत्री पाऊसकर यांनी मंत्री मिलिंद नाईक यांच्या समवेत हेडलॅण्ड सडय़ावरील त्या टाक्यांच्या परीसराची पाहणीही केली.